IRCTC Scam : बिहार निवडणुकीपूर्वी यादव कुटुंबाला मोठा धक्का!

•आयआरसीटीसी घोटाळा: लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राबडी देवींविरोधात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश कंत्राट वाटपात षडयंत्र आणि पदाचा गैरवापर; ‘महागठबंधन’च्या प्रचाराला अडचणी
ANI :- बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने या तिन्ही प्रमुख नेत्यांविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले. या आदेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीच्या (आरजेडी-काँग्रेस) प्रचाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
कोर्टाने काय म्हटले?
विशेष न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले की, ‘संबंधित नेते षडयंत्र रचण्यात सहभागी होते आणि त्यांनी सार्वजनिक सेवक म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता.’
काय आहे नेमका घोटाळा?
हा खटला सीबीआयने तपासला असून तो बीएनआर रांची आणि बीएनआर पुरी या आयआरसीटीसीच्या दोन हॉटेल्सच्या देखभाल कामाच्या कंत्राटांच्या वाटपामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी हे कंत्राट एका खासगी कंपनीला नियमबाह्य पद्धतीने दिले होते, असा सीबीआयचा आरोप आहे.
बिहार निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडी यांच्यात थेट लढत आहे. अशा वेळी, आरजेडीच्या सर्वोच्च नेत्यांविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश येणे, हा महाआघाडीसाठी मोठा राजकीय पेच निर्माण करणारा आहे.


