Piyush Chawla : दोन दशकांचा प्रवास संपला! पियूष चावलाने सर्व फॉर्मेटमधून घेतला निवृत्तीचा निर्णय

• Piyush Chawla Riterment News 2007 चा टी20 आणि 2011 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग
भारतीय फिरकीपटू पियूष चावलाने अखेर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. IPL 2025 च्या लिलावासाठी त्याने आपले नाव दिले होते, परंतु कोणत्याही संघाने त्याला निवडले नाही. त्यानंतर पियूषने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली.
“हा अध्याय इथेच संपवत आहे! खेळाच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत आहे. या सुंदर प्रवासात पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं.
IPLमध्ये 192 सामन्यांत 192 बळी; चार मोठ्या फ्रँचायझींसाठी केला खेळ
पियूष चावलाचा क्रिकेट प्रवास अविस्मरणीय ठरला. त्याने 2006 साली इंग्लंडविरुद्ध मोहाली येथे आपला पहिला टेस्ट सामना खेळला होता. त्यानंतर 2007 मध्ये वनडे आणि 2010 मध्ये टी20 मध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने 3 टेस्ट (7 बळी), 25 वनडे (32 बळी) आणि 7 टी20 (4 बळी) सामने खेळले.
IPL मध्ये पियूषने पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि शेवटी मुंबई इंडियन्ससाठी खेळत 192 सामन्यांमध्ये 192 बळी घेतले. IPLचा हा भाग त्याच्यासाठी ‘विशेष पर्व’ ठरल्याचं त्याने आपल्या निवृत्ती पत्रात नमूद केलं.
तो म्हणतो, “मी BCCI, उत्तर प्रदेश आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन, तसेच सर्व प्रशिक्षकांचे आभार मानतो. माझ्या वडिलांचा उल्लेख विशेष करतो, कारण त्यांच्यामुळेच हा प्रवास शक्य झाला.”
“मी क्रीझवरून दूर जात आहे, पण क्रिकेट माझ्यात सदैव जिवंत राहील,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पियूष चावला आता मैदानाबाहेरचा नवा प्रवास सुरू करणार असून, क्रिकेटमध्ये मिळालेल्या अनुभवाचा उपयोग तो भविष्यातील वाटचालीसाठी करणार आहे.


