पिंपरी चिंचवड

Pimpri-Chinchwad Rain Update : पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

• पवना धरण 99 टक्के भरले, शहरवासीयांना मोठा दिलासा; महापालिकेच्या उपाययोजनांमुळे घरात पाणी शिरले नाही

पिंपरी-चिंचवड :- गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार हजेरी लावली. दिवसभर कोसळलेल्या संततधारेमुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले होते, ज्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

शहरभर पाणीच पाणी

पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी, पिंपळेगुरव, सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे यांसारख्या शहराच्या सर्वच भागांत पाऊस झाला. पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रो आणि जलवाहिनीच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदकाम झाल्यामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. निगडीतील टिळक चौक ते बजाज ऑटोसमोरील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आणि वाहतूक कोंडीही झाली होती.

पवना धरण भरले, मोठा दिलासा

या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण तब्बल 99 टक्के भरले आहे. यामुळे पुढील वर्षभर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महापालिकेची तत्परता

दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने कोठेही घरात पाणी शिरले नाही. सखल भागांत साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यात आल्यामुळे मोठी गैरसोय टळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0