Pimpre-Chinchwad News : मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ‘जगातील सर्वात उंच’

•World’s tallest Sambhaji Maharaj statue in Pimpri Chinchwad : 100 फूट उंचीच्या पुतळ्याची लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद; 48 कोटी खर्चून उभारणी
पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवडजवळील मोशी येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा असल्याची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या या 100 फूट उंच पुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
ऐतिहासिक मानवंदना
या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ला अनोखी मानवंदना देण्यात आली. तब्बल तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि पाचशे ध्वजांच्या गजरात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात मानवंदना दिली. यावेळी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले, तर चिखली येथील संतपीठाने कीर्तन सादर केले. बाल शिवभक्तांच्या शिवगर्जनांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी गायलेल्या शिवगीतांवर शिवभक्तांनी ठेका धरला होता.
पुतळ्याची वैशिष्ट्ये
मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र परिसरात उभारण्यात येत असलेला हा पुतळा ब्राँझ धातूपासून तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची तब्बल 100 फूट आहे आणि त्याच्या उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 48 कोटी रुपये खर्च करत आहे. याच परिसरात शंभू सृष्टी देखील साकारली जात आहे.



