क्राईम न्यूज

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: ‘फॉरेन्सिक अहवाला’तून अक्षरांची पुष्टी! – मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली अत्यंत गंभीर माहिती

Phaltan Dr Suicide Case : “पोलिस अधिकारी बदनेने फसवणूक करून शारीरिक शोषण केले.” – मुख्यमंत्र्यांचा सभागृहात धक्कादायक खुलासा; लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याचे तपासात निष्पन्न; SIT आणि न्यायिक चौकशी सुरू

नागपूर :- फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने आज (9 डिसेंबर) महाराष्ट्र विधानसभेत एक गंभीर वळण घेतले. या संवेदनशील प्रकरणावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठी माहिती दिली. त्यांनी पुष्टी केली की, या प्रकरणात न्यायिक समितीमार्फत चौकशी सुरू आहे आणि विशेष तपास पथक (SIT) कार्यरत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी फॉरेन्सिक तपासाचा निष्कर्ष सभागृहात मांडला. ते म्हणाले, “आतापर्यंतच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे, ती हँडरायटिंग तिचीच आहे.”

शारीरिक शोषण आणि फसवणूक

या प्रकरणाच्या मुळाशी जात मुख्यमंत्री म्हणाले की, या केसमध्ये आरोपी असलेल्या पोलीस अधिकारी बदनेने तिची फसवणूक करून तिचं शारीरिक शोषण केले असल्याचे तपासातून निष्पन्न होत आहे. बदनेने आधी लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर वेगळी भूमिका घेतली. या शारीरिक शोषणानंतर दुसऱ्या आरोपीनेही परिस्थितीचा फायदा उचलून तिची फसवणूक केली. या दोघांची नावं लिहून तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘अनफिट’ प्रमाणपत्रावरही प्रश्न

याच डॉक्टर महिलेने काही महत्त्वाच्या गुन्ह्यांमधील आरोपींना अटकेसाठी ‘अनफिट’ असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. यावर तत्कालीन पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्र लिहून आक्षेप घेतला होता. हा गंभीर मुद्दा पाच महिन्यांपूर्वीचा असून, त्यासंदर्भात स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी न्यायाधीशाची नेमणूक केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आत्महत्या प्रकरणामध्ये बदनेने केलेली फसवणूक आहे आणि त्यातून झालेल्या मृत्यूची चौकशी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालली आहे. “तपास अजून संपलेला नाही, लवकरच आरोपपत्र दाखल होईल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिले.

vivek

Recent Posts