Phaltan Doctor Suicide : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप अखेर मागे

•फलटणच्या डॉक्टर मृत्यू प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ चौकशी होणार
मुंबई :- फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला राज्यव्यापी कामबंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक प्रतिसाद आणि आश्वासनानंतर केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्डने सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे कोअर कमिटीची बैठक घेऊन हा संप मागे घेतला.
सोमवारपासून निवासी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभागातील (OPD) सेवा पूर्णपणे बंद ठेवत, फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवा (Emergency Services) सुरू ठेवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.
मागण्या मान्य, संप मागे
या चर्चेनंतर सरकारने डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या
1.प्रकरणाची व्यापक आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय विशेष समिती (SIT) स्थापन केली जाईल.
2.निवासी डॉक्टरांच्या संप कालावधीतील दोन दिवसांची उपस्थिती कर्तव्यावर (On Duty) मानली जाईल.
3.या आंदोलनात सहभागी झालेल्या डॉक्टरांना कोणताही शैक्षणिक किंवा प्रशासकीय दंड होणार नाही.
सरकारने या मागण्या कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने, केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्डने अधिकृतपणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच सर्व निवासी डॉक्टर तात्काळ कामावर रुजू होतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या आंदोलनामुळे काही दिवसांपासून विस्कळीत झालेल्या वैद्यकीय सेवा आता पूर्ववत होण्यास मदत होईल.


