ठाणेमुंबई

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: राज्यातील आरोग्य सेवा कोलमडणार!

Phaltan Doctor Murder Case : ‘मार्ड’सह सर्व डॉक्टर संघटनांचे आजपासून (सोमवार, 3 नोव्हेंबर) कामबंद आंदोलन; मागण्या पूर्ण होईपर्यंत बहिष्कार

मुंबई :- फलटण येथील एका महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या पोलीस तपासाच्या दिशेवर असमाधान व्यक्त करत राज्यातील डॉक्टरांच्या सर्व प्रमुख संघटनांनी आज, सोमवार (3 नोव्हेंबर) पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. Doctor Strike डॉक्टरांच्या या एकत्रित बहिष्कारामुळे राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर कोलमडण्याची भीती आहे.

महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात प्रथमच ‘मार्ड’ (निवासी डॉक्टर), ‘अस्मि’ (आंतरवासिता डॉक्टर), ‘एमएसआरडीए’ (वरिष्ठ निवासी डॉक्टर), ‘मॅग्मो’, ‘आयएमए’, आणि ‘एएमओ’ या सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामधील बाह्यरुग्ण सेवा (OPD) वर आजपासून (3 नोव्हेंबर) संपूर्ण बहिष्कार टाकण्यात येणार आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.

यासोबतच मॅग्मो, आयएमए, एएमओ या संघटना सर्व प्रशासकीय बैठका आणि दृकश्राव्य माध्यमांतून होणाऱ्या बैठकांवर बहिष्कार घालतील. मॅग्मो व आयएमए या संघटना ७ नोव्हेंबर रोजी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर बहिष्कार टाकतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 14 नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टरांच्या संघटनांनी रविवारी (2 नोव्हेंबर) मेणबत्ती मोर्चा काढून घटनेचा निषेध केला होता.

डॉक्टरांचे आंदोलन लक्षात घेता रुग्णसेवा बाधित होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यरुग्ण विभाग व अत्यावश्यक विभागांमध्ये प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शस्त्रक्रिया बाधित होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग आणि आपत्कालीन विभाग सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व रुग्णालयांच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता सर्व अधिष्ठातांची बैठक बोलावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0