Gadchiroli flood News : गडचिरोली पाण्याखाली! 15 मार्ग बंद, मजूर वाहून गेला, दोन बस अडकल्या

Gadchiroli flood News : गडचिरोली-आरमोरी व गडचिरोली-चामोर्शी महामार्ग ठप्प; वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांचा शोध
गडचिरोली | मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यात हाहाकार माजवला असून, पूरपरिस्थितीमुळे 15 पेक्षा अधिक रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.त्यात गडचिरोली–आरमोरी आणि गडचिरोली–चामोर्शी हे दोन राष्ट्रीय महामार्ग (NH-353) ठप्प झाले आहेत.आरमोरी तालुक्यातील वडधा-कुरंझा मार्गावर बांधकाम मजूर सायकलसह वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. Gadchiroli flood News
वाहून गेलेल्याचे नाव राजू विश्वनाथ तुमराम (वय 45, रा. कुरंझा) असे आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नाल्यावरून जाताना तो पुराच्या प्रवाहात गेला. बचावकार्य सुरू असतानाही, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
8 जुलैच्या रात्री मुसळधार पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन बस अडकून पडल्या.गडचिरोली–आरमोरी मार्गावरील ठाणेगाव येथे अडकलेल्या खाजगी बसमध्ये 50 प्रवासी, तर गडचिरोली–नागपूर महामार्गावर एस.टी. महामंडळाची बस गाढवी नदीजवळ अडकून 23 प्रवासी अडकले होते.
इंजिनमध्ये पाणी शिरल्याने दोन्ही बस बंद पडल्या. पण प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे जेसीबी व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांनी प्रवाशांची सुखरूप सुटका केली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व नाल्यांवर बॅरिकेडिंग लावण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.वाहनधारकांनी पाण्याचा अंदाज न घेता प्रवास करू नये, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
नागरिकांनी अत्यंत गरजेशिवाय प्रवास टाळावा, असा प्रशासनाचा पुनःपुन्हा आग्रह आहे.


