Panvel News : पनवेल मध्ये गुरु रेसिडेन्सी आणि गुरुकृपा या दोन इमारतींमध्ये अनधिकृत ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांची तक्रार
•मनसेचा अनधिकृत बांधकामाविरुद्ध प्रशासनाला इशारा
पनवेल जितिन शेट्टी :- रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांचे भांडाफोड झाले आहे. पनवेल तालुक्यातील अकुर्ली या ठिकाणी दोन अनधिकृत इमारतींमुळे वादंग पेटले आहे. या जागेवर गुरु रेसिडेन्सी आणि गुरुकृपा या दोन इमारतींमध्ये अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम झाले असल्याचे समोर आले आहे.
हे बांधकाम कुठल्या परवानग्यांवर उभारले गेले?
सर्वसामान्य नागरिकांच्या मेहनतीचा पैसा या बेकायदेशीर इमारतीत गुंतवला गेला आहे. या प्रकरणी रायगड जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संदेश ठाकूर यांना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी तक्रारी दिल्या आहेत. संदेश ठाकूर या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला असून, त्यांनी NAINA सिडको, कोकण विभागीय महसूल विभाग, मुख्य दक्षता अधिकारी, आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
महसूलाचा मोठा फटका !
या अनधिकृत बांधकामामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. महाराष्ट्रावर आधीच ७.११ लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना, असे बांधकामे महसुलाला चूना लावत आहेत. हे बांधकाम कोणत्या अधिकारावर आणि कोणाच्या आशिर्वादाने उभे राहिले?
विकास प्राधिकरणे आणि सिडकोवर गंभीर प्रश्न
• NAINA आणि सिडको प्रशासन काय करत होते?
• एवढी मोठी बांधकामे त्यांच्या नजरेआड कशी राहिली?
• अधिकारी आणि बिल्डर यांच्यात ‘खुर्चीखाली’ काही ‘देणं-घेणं’ झालं आहे का?
• सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आणि विश्वास घालवणाऱ्या बिल्डर आणि विकासकांवर आता तरी कारवाई होणार का?
संदेश ठाकूर यांनी प्रशासनाला ठाम इशारा दिला आहे की, बिल्डर आणि विकासकांनी केलेल्या या बेकायदेशीर बांधकामांवर MRTP कायदा १९६६ अंतर्गत त्वरित एफआयआर दाखल करून कारवाई केली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात येईल.
हे पाहणे महत्त्वाचे आहे की, महसूल बुडवणाऱ्या बिल्डर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सरकार आणि प्रशासन कधी आणि कशी कारवाई करणार? सरकारने या प्रकरणात ठोस पावले उचलून, सामान्य माणसाचा विश्वास आणि महसूल वाचवण्याची नितांत गरज आहे.
“जनतेचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची वेळ आली आहे. आता कारवाई होईल का?”