Panvel News : शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी यांनी केली खड्ड्यातील पाण्याने अंघोळ, प्रशांत ठाकूर यांना विचारला जाब!
•प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शेकाप पदाधिकारी बबन विश्वकर्मा आक्रमक होऊन पनवेलकरांच्या समस्या न सोडवल्याने संतप्त पदाधिकाऱ्याने खड्ड्यातील पाण्याने केले अंघोळ
पनवेल :- सोमवारी (21 ऑक्टोबर) सकाळी नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर 8 येथील पुर्णिमा दीप या सोसायटीमध्ये राहणारे बबन विश्वकर्मा यांनी घरात पाणी नसल्याने घरासमोरील रस्त्यांच्या खड्यांमध्ये साचलेल्या खड्यातील पाण्यात जाऊन आंघोळ केली आणि त्याची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर पसरवली. विश्वकर्मा हे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आहेत.
त्यांना या ध्वनीचित्रफीती मागील कारण विचारल्यावर रस्त्यातील खड्यांमुळे घरासमोर तळ्याचे रुप आले आणि घरात आंघोळीसाठी मूबलक पाणी नसल्याने ही अवस्था पनवेलकरांवर आल्याने सरकारी यंत्रणेसह स्थानिक आमदारांना तीन वेळा संधी देऊन सुद्धा ही स्थिती बदलू न शकल्याने ही कृती केल्याचे विश्वकर्मा यांनी सांगीतले. पनवेल महापालिका क्षेत्रात अजूनही सिडको मंडळाकडेच नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे, काळुंद्रे या वसाहतींना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिका होऊन आठ वर्षे उलटली तरी पाण्याचा प्रश्न सिडको मंडळ आणि पनवेल महापालिका सोडवू शकली नाही. अशीच पाणीबाणी मागील दोन आठवड्यांपूर्वी खारघर येथील सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील रहिवाशांनी अनुभवली. सिडको मंडळ पाणी प्रश्न न सोडवू शकल्याने रहिवाशांना टॅंकरचे पाणी लाखो रुपये खर्च करुन खरेदी करावे लागते.
भारतीय जनता पक्षाने तीनवेळा विधानसभेची उमेदवारी देऊन सुद्धा पनवेलकरांसमोरील पाणी टंचाईचा प्रश्नासह इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याने प्रशांत ठाकूर यांना यावेळच्या निवडणूकीत मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. याचा लाभ ठाकूर यांच्या विरोधी गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार नकारार्थी प्रचारातून करता येईल, मात्र पनवेलकरांचे पाणी, आरोग्य व शिक्षणासह मालमत्ता कर, रस्त्यातील खड्डे आणि खंडीत विजेसारखे मूलभूत गरजेच्या समस्या कधी सुटणार हा प्रश्न पनवेलच्या मतदारांकडून विचारला जात आहे.
बबन विश्वकर्मा, पदाधिकारी, शेकाप
म्हणाले की,मी दररोज भेडसावणा-या पाणी व खड्डे या समस्येची सत्यस्थिती दाखविली आहे. सिडको वसाहतीमधील आम्ही नागरीक दररोज हे सहन करत आलोय. पावसाळ्यात घरात पाणी नाही, घराबाहेर रस्त्यातील खड्डयामुळे तळे साचले. ही आंघोळ म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचा सरकारी यंत्रणा आणि तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या निष्क्रियतेविरोधातील रोष आहे. हा राजकीय स्टंट नाही.
आमदार प्रशांत ठाकूर आणि महायुतीचे उमेदवार म्हणाले की,
शेकापचे चारवेळा आमदार राहीलेले मागील तीन वर्षांपासून तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराची आंघोळ शेकापने केली होती, त्यात सर्वानाच पावन करुन घेतले होते. आज एका ठिकाणच्या खड्यात विश्वकर्मा यांनी स्वत:ला पावन करुन घेतले आहे. पण हे खड्डे दुरुस्त करुन येथील मूलभूत सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा हा आम्हीच करतो. म्हणून आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच पक्षाचे आमदार राज्याच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा होते. त्यांनी काय बदल केला ते सांगा. आम्ही केलेल्या कामाची जंत्री वाचून दाखवू शकतो.