Bombay High Court Bomb threat : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपासणी मोहीम

- गेल्या आठवड्यातही दिल्ली-मुंबई उच्च न्यायालयाला एकाच दिवशी मिळाली होती धमकी
मुंबई :- हुतात्मा चौकातील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल शुक्रवारी पुन्हा एकदा प्राप्त झाला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली, मात्र त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. यामुळे उच्च न्यायालयातील कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.
यापूर्वी गेल्या आठवड्यातही दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाला एकाच दिवशी बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाले होते. त्या वेळी संपूर्ण न्यायालय रिकामे करून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा धमकीचा ई-मेल आल्यामुळे मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
शुक्रवारी पहाटे हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. तातडीने सकाळीच पोलीस पथकाने न्यायालयाच्या इमारतीची कसून तपासणी केली, पण त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. या दोन्ही धमकीच्या प्रकरणांमध्ये एकाच व्यक्तीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, आरोपीने ‘डार्क नेट’ आणि ‘व्हीपीएन’ (VPN) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्याला पकडण्यात अडचणी येत आहेत.


