
पनवेल जितिन शेट्टी : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने यंदा मूर्तिकारांना तब्बल ३४ टन शाडू मातीचे मोफत वाटप केले आहे. श्रीगणेशोत्सव २०२५ हा पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी पालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्री. स्वरूप खारगे यांच्या नेतृत्वात पर्यावरण विभागाने विशेष नियोजन केले आहे. २६ जुलै रोजी कुंभारवाडा, पनवेल येथे उपायुक्त श्री. स्वरूप खारगे यांच्या उपस्थितीत २४ हून अधिक मूर्तिकारांना ३४ टन शाडू मातीचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी मूर्ती कारखान्यांना भेट देऊन मूर्तिकारांशी संवाद साधला आणि पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. पीओपी, केमिकल रंग आणि प्लास्टिकचा वापर टाळून शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.


याप्रसंगी स्थानिक मूर्तिकारांनी उपायुक्तांना शाडू मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती सप्रेम भेट दिली.गतवर्षी २० मूर्तिकारांना १२ टन माती पुरवण्यात आली होती, परंतु यंदा उत्सवाच्या व्यापकतेनुसार मातीचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. याशिवाय, महानगरपालिका पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी ‘प्रथम अर्जदारास प्राधान्य’ तत्त्वावर जागा उपलब्ध करून देणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम राबवून मूर्तिकार आणि नागरिकांना सहभागी करून घेण्याचा पालिकेचा मानस आहे.
उपायुक्त श्री. स्वरूप खारगे यांनी विश्वास व्यक्त केला की, शाडू माती वाटपासारख्या उपक्रमांमुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला मूर्तिकारांचे योगदान आणि नागरिकांचा सहभाग नक्कीच वाढेल. या कार्यक्रमास पर्यावरण विभागाचे प्रमुख मनोज चव्हाण, लिपिक प्रवीण व्हलगळ, मूर्तिकार अनंत चिरनेरकर, नरेश कुंभार, गजानन वाजेकर, राहुल घोंगे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.पनवेल महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडले आहे!


