क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Bhayandar Police News : पोलीस आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

Mira Bhayandar Police Latest News : ऑगस्ट महिन्यातील गुन्हे उकल्यानंतर पोलिसांचे कौतुक; गुन्हे शाखा ठरली अव्वल

मिरा-भाईंदर :- ऑगस्ट 2025 महिन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात गुन्ह्यांची यशस्वी उकल, आरोपींना शिक्षा होण्यास मदत करणाऱ्या आणि गुन्हेगारांना जेरबंद करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

माणिकपूर पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी

माणिकपूर पोलीस ठाण्याला त्यांच्या गंभीर चोरीच्या गुन्ह्यातील कामगिरीबद्दल प्रथम क्रमांक मिळाला. एका अज्ञात चोरट्याने एका वृद्धाच्या घरात प्रवेश करून सुमारे 1.50 कोटी रुपयांचे दागिने चोरले होते. या घटनेचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-4 च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून धक्कादायक माहिती समोर आणली. चोरी करणारी व्यक्ती पुरुष नसून, फिर्यादीच्या गुजरात येथील नातेवाईक ज्योती मोहन भानुशाली (वय 27) ही महिला असल्याचे निष्पन्न झाले. तिने पुरुषाचा वेश धारण करून ही चोरी केली होती. पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेला सर्व1490.86 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2320 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत केले.

या कामगिरीसाठी माणिकपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक, सहाय्यक फौजदार संतोष मदने, पोलीस हवालदार धनंजय चौधरी, गोविंद केंद्रे, विकास राजपूत आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-4 चे पोलीस निरीक्षक अबिराज कुराडे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

काशीमीरा पोलीस ठाण्याची धाडसी कारवाई

काशिमीरा पोलीस ठाण्याने एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावल्याबद्दल द्वितीय क्रमांक पटकावला. गोपनीय माहितीच्या आधारे सनशाईन हॉटेलजवळ छापा टाकून पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन कार, फाईटर पंच, आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तपासामध्ये या आरोपींचे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांशी संबंध असल्याचे समोर आले. अटक आरोपींपैकी एका आरोपीचे नाव कानजोधाई ऊर्फ कानू सुमराभाई मनका आहे. आरोपींवर यापूर्वीही खून, दरोडा, जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी करणारे काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, पोलीस उपनिरीक्षक ओंकार कोवे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण यांचा सत्कार करण्यात आला.

पेल्हार पोलीस ठाण्याची कामगिरी

पेल्हार पोलीस ठाण्याने एका कंपनीतून 6.50 लाख रुपयांच्या तांब्याच्या वस्तूंच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. गुन्हा घडल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला. त्यांनी उस्मानाबाद, वाशी येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरी करताना वापरलेला ट्रकही जप्त करण्यात आला. तपासात आरोपींनी चोरीचा माल पुण्यात विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पुण्यातून संपूर्ण 100% चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या कामगिरीबद्दल पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे, पोलीस निरीक्षक दिलीप राख, शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे, आणि पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे यांचा सत्कार करण्यात आला.

चौथा क्रमांक: वालीव पोलीस ठाण्याचे वाहनचोरी उघडकीस
वालीव पोलीस ठाण्याने वाहनचोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणत चौथा क्रमांक मिळवला. पोलिसांनी एका आरोपीला, अल्फाज इद्रीस खान ऊर्फ उडो (वय 23) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून केलेल्या चौकशीत नवी मुंबई आणि मुंबई परिसरातून चोरी केलेल्या एकूण 2 लाख रुपयांच्या 4 रिक्षा जप्त करण्यात आल्या.

या कामगिरीबद्दल वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव बाबर, सहाय्यक फौजदार शैलेश पाटील, पोलीस हवालदार किरण म्हात्रे आणि पोलीस नाईक बाळू कुटे यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट दोषसिद्धीसाठी नयानगर पोलीस ठाण्याचे कौतुक
याव्यतिरिक्त, नयानगर पोलीस ठाण्याने एका गुन्ह्यात आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात यश मिळवल्याबद्दलही गौरव करण्यात आला. 2022 मध्ये जिगर हरीष पुंगेरा या आरोपीला अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अटक करण्यात आली होती. तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मिलिंद बोरसे यांनी सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने आरोपीला 2 वर्षे, 1 महिना, 17 दिवस कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या कामगिरीसाठी पोउपनि मिलिंद बोरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0