मुंबई

Panvel News : पनवेलमध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग; एका व्यक्तीचा मृत्यू

•टायर गोदामासह नवीन पनवेलमधील घरात लागली आग; चार दिवसांत तिसरी मोठी घटना, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पनवेल :- पनवेल परिसरात शुक्रवारी (24 ऑक्टोबर 2025) दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने शहराच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दोन घटनांपैकी एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पळस्पे फाटा येथील टायर गोदामाला आग

पहिली घटना दुपारी पनवेल शहरातील पळस्पे फाटा येथे दत्त स्नॅक्सजवळ आणि पीके वाईन्सच्या शेजारी असलेल्या एका टायर गोदामात घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात दाट काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. टायर्समुळे आग झपाट्याने पसरली. पनवेल अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नवीन पनवेलमधील घरात आग, एकाचा मृत्यू

दुसरी घटना नवीन पनवेल उपनगरातील सेक्टर-4 मधील प्लॉट क्रमांक 89 येथे सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणी घराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली.

गॅलरीतून आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि आग विझवली. घरात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याचबरोबर, वरच्या मजल्यावर अडकलेल्या एका कुत्र्याचीही जवानांनी सुखरूप सुटका केली.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या दोन घटनांच्या अवघ्या चार दिवसांपूर्वीच दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कामोठे येथे घरात आग लागून मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला होता. अल्पावधीत पनवेल परिसरात सलग तीन आगीच्या मोठ्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इमारती आणि व्यावसायिक आस्थापनांमधील अग्निसुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

vivek

Recent Posts