Devendra Fadnavis : महायुतीत ‘वैचारिक’ महायुद्ध! सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; फडणवीसांची भूमिका अन् दादांची ‘सावध’ खेळी

•”सावरकरांचा विरोध मान्य नाही” म्हणत फडणवीसांनी फुंकले रणशिंग; अजित पवार मात्र निवडणुकीच्या गणितात गुंग
जळगाव | 70 हजार कोटींच्या आरोपावरून सुरू झालेला भाजप आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा आता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या विचारधारेपर्यंत येऊन पोहोचला आहे. आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार स्वीकारण्याचा दिलेला इशारा आणि त्याला सूरज चव्हाण यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरून भाजपची भूमिका पक्की असल्याचे स्पष्ट केले आहे.
फडणवीसांचे रोखठोक भाष्य: “विरोध मान्य नाही!”
सावरकरांच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना थेट लक्ष्य करणे टाळले असले तरी, विचारधारेवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, “वीर सावरकरांच्या विचारांना अजित दादांनी कधी विरोध केलाय, असे मी पाहिलेले नाही. पण आमची भूमिका स्पष्ट आहे की, सावरकरांचा कोणताही विरोध आम्हाला मान्य नाही.” शेलार यांनी दिलेल्या इशाऱ्याची पाठराखण करत फडणवीसांनी सावरकरांचा मुद्दा भाजपसाठी ‘नॉन-नेगोशिएबल’ असल्याचे अधोरेखित केले.
अजित पवारांची ‘विकासा’वर बॅटिंग; राजकीय प्रश्नांना बगल
दुसरीकडे, अजित पवार यांनी या वादात अधिक पडणे टाळले आहे. पत्रकारांनी सावरकरांच्या मुद्द्यावर विचारले असता ते म्हणाले, “तुम्ही मला फक्त विकासाबद्दल आणि महापालिका निवडणुकीबद्दल विचारा. मी ज्या महापालिकेत प्रचारासाठी जाईल, त्याबद्दलच बोलेन. इतर वैचारिक प्रश्नांची उत्तरे मी निवडणुका संपल्यावर देईन.” दादांची ही सावध भूमिका म्हणजे भाजपसोबतचा तणाव आणखी वाढू नये, यासाठी घेतलेली माघार आहे की निवडणुकीची रणनीती, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सूरज चव्हाणांचा ‘संविधाना’चा दाखला
राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना म्हटले की, “कुणीही कुणावरही जबरदस्तीने विचार लादू शकत नाही. हा देश संविधानावर चालतो.” या विधानामुळे महायुतीत वैचारिक मतभेद किती खोलवर आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.


