Mumbai Crime NEWS : सराफाला लुटणाऱ्या तीन रेल्वे पोलिसांवर निलंबनाची कारवाई!

Mumbai Latest Crime News : गुन्हे शाखेकडे तपास, चार पोलिसांची मुख्यालयात बदली; रेल्वे पोलिसांच्या गैरव्यवहाराचा नवा पर्दाफाश
मुंबई,:- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात एका सराफाला दमदाटी करून 30 हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या तीन रेल्वे पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. या गंभीर गैरव्यवहारामुळे रेल्वे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील कारवाई म्हणून आणखी चार पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News
ही घटना 10 ऑगस्ट रोजी रात्री मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात घडली. राजस्थानचे सराफ कुलदीप कुमार सोनी (वय 37) हे आपल्या मुलीसोबत मुंबईत एका प्रदर्शनासाठी आले होते. राजस्थानला परत जाताना मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर तीन रेल्वे पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता पोलिसांना सोन्याची लगड आणि 31 हजार 900 रुपये सापडले. सोनी यांनी सोन्याच्या पावत्या दाखवल्या, तरीही पोलिसांनी त्यांची मुलगी समोर असताना त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
अंधाऱ्या खोलीत नेऊन धमकी
पोलिसांनी सोनी यांना फलाटाजवळील एका अंधाऱ्या खोलीत नेले आणि अटक करण्याची धमकी दिली. ट्रेन सुटण्याच्या वेळी, त्या तीन पोलिसांनी सोनी यांच्याकडील 30 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्यांना सोडून दिले.
राजस्थानला परतल्यावर सोनी यांनी हा प्रकार रतनगड पोलीस ठाण्यात सांगितला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आला. मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 119 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रेल्वे गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
तीन पोलीस निलंबित, चार पोलिसांची बदली
या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई केली. रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफाला लुटणाऱ्या तिघा पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, हेड कॉन्स्टेबल जगताप आणि भोसले यांचा समावेश आहे. या तिघांचीही विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, या प्रकरणात सामील असलेल्या आणखी चार पोलिसांची तात्काळ मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.


