मुंबई

Panvel Crime News : पनवेलमध्ये धक्कादायक चोरी : चार लाखांचे दागिने आणि मोबाईल लंपास, पोलिस तपासाला लागले

पनवेल जितिन शेट्टी : अलिबाग येथील एका व्यक्तीला पनवेलमधील ग्रिट्स बारमध्ये बिअर पिणे चांगलेच महागात पडले आहे. बारच्या बाहेर सिगारेट घेण्यासाठी गेलेल्या अमोल पद्माकर पाटील यांच्या गळ्यातील चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केले. या धक्कादायक घटनेनंतर पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अलिबाग परिसरात राहणारे अमोल पाटील हे कार्ले खिंडीत विला केअर टेकर म्हणून काम करतात. ते आपले मित्र कल्पेश, अतिश आणि जयेश यांच्यासोबत पनवेलमध्ये कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर चौघेही संध्याकाळी ओएनजी गेटजवळील ग्रिट्स बारमध्ये बिअर पिण्यासाठी गेले. यावेळी अमोल यांच्या गळ्यात चार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते. बिअर पित असताना अमोल सिगारेट घेण्यासाठी बारच्या बाहेर पानटपरीवर गेले. तिथे त्यांनी चुकून एका अनोळखी व्यक्तीला धक्का दिला, ज्यामुळे किरकोळ झटापट झाली. अमोलने माफी मागितल्यानंतर ते पुन्हा बारमध्ये परतले. मात्र, याच दरम्यान त्यांच्या गळ्यातील दागिने आणि मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले.

या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पनवेल शहर पोलिस तपास करत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

vivek

Recent Posts