मुंबईठाणे
Trending

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला यंदा भावनिक किनार; समर्थकांना ‘चणा डाळ, गूळ, पीठ’ घेऊन येण्याचे आवाहन

Pankaja Munde Latest News : ‘यंदाचा मेळावा राजकीय व्यासपीठ नाही, पूरग्रस्तांना मदत करण्याची परंपरा’; 2 ऑक्टोबरला सावरगाव घाट येथे मेळावा

मुंबई :- राज्यात, विशेषत: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये पूरस्थितीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अशा संकटाच्या काळात, राज्याच्या पर्यावरणमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी यंदाच्या दसरा मेळाव्याला सामाजिक आणि भावनिक किनार दिली आहे. त्यांनी समर्थकांना मेळाव्याला येताना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चणा डाळ, गूळ आणि गव्हाचे पीठ सोबत घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.

दसरा मेळावा: परंपरा आणि समाजकारण

दसरा म्हटलं की, बीड जिल्ह्यातील भगवान भक्ती गडावरील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात चर्चेत असतो. यंदाही 2 ऑक्टोबर रोजी सावरगाव घाट येथे मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी या मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली.

त्या म्हणाल्या, “यंदाचा आपला दसरा मेळावा म्हणजे केवळ मेळावा नाही, सभा किंवा राजकीय व्यासपीठ नाही. ही परंपरा भगवान बाबांनी सुरू केली, मुंडे साहेबांनी तिला उंचीवर नेले. माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी ही परंपरा खंडित होऊ देणार नाही.”

पुरणपोळीसाठी मदतीचा हात

पंकजा मुंडे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, महापुरामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत बेताची परिस्थिती निर्माण झाली आहे.

“माझा दसरा मेळावा अठरापगड जाती-धर्माचा संगम असलेली परंपरा आहे. त्यामुळे, पूरग्रस्त भागात यंदा ज्यांच्या घरात चूल पेटू शकत नाही, दसऱ्यादिवशी पुरणपोळी खाता येणार नाही, त्यांच्यासाठी आपण पुढे या,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्याला येताना चणा डाळ, गूळ, गव्हाचे पीठ सोबत आणून ते भगवान बाबांच्या चरणी अर्पण करावे. भगवान बाबांच्या चरणी आलेला हा प्रसाद पूरग्रस्त गावांमध्ये पोहोच करायचा आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही मदत

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 2215 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले तरी तेवढी मदत पुरेशी नाही. त्यामुळेच सर्वजण पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आहेत. गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

पंकजा मुंडे यांच्या या आवाहनामुळे यंदाचा दसरा मेळावा राजकीय शक्तीप्रदर्शनाऐवजी सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरणार आहे.

भेटूया: 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता, सावरगाव घाट, भगवान भक्ती गड येथे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0