Pankaja Munde : लोकसभेतील पराभवानंतर भाजप पंकजा मुंडेंवर राज्यसभेची जबाबदारी मिळणार ?
लोकसभा निवडणुकीत बीडमधून भाजपच्या उमेदवार Pankaja Munde यांचा पराभव झाला होता. आता मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची भाजपची तयारी सुरू आहे.
मुंबई :- बीड लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. त्या दिशेने भाजपमध्ये हालचाली झाल्याची माहिती आहे. नुकतीच दिल्लीत भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून आले असून त्यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने प्रचंड निराश झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर नियुक्ती करावी यावर राज्यातील भाजप नेत्यांमध्ये एकमत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती समोर आली आहे.