Panaji News : धबधब्यांवर पुन्हा पर्यटकांची गर्दी; सरकारकडून निर्बंध उठले

निसर्गसंपत्तीचे जतन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पणजी, २६ ऑगस्ट : मान्सूनच्या सुरुवातीला नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील धबधबे, नद्या, तलाव, खाणींचे खंदक आदी ठिकाणी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पर्यटकांसाठी दिलासादायक निर्णय घेत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे निर्बंध उठवले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर वन विभागाने स्पष्ट केले की, गोव्यातील कोणत्याही धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास बंदी नाही. दूधसागर, मैनापी, सावरी, पाली यांसारख्या नामांकित धबधब्यांवर आवश्यक सुविधा व सुरक्षा उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जबाबदार पर्यटनाची ग्वाही
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “धबधब्यांना भेट देताना हवामानाचा अंदाज लक्षात घेणे आवश्यक आहे. आयएमडीच्या सूचनांचे पालन करूनच पर्यटकांनी सहलींचे नियोजन करावे. राज्य सरकार जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देत असताना स्थानिक लोकांचे हित आणि पर्यावरणाचे रक्षण यालाही प्राधान्य देत आहे. नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
अपघातांचे प्रमाण वाढते
पावसाळ्यात नद्या व धबधब्यांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढते. वेगवान प्रवाहामुळे बुडण्याच्या घटनांत वाढ होते. जुन्या खाणींमध्येही पाणी साचल्याने धोका वाढतो. याच कारणास्तव काही दिवसांपूर्वी सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बंदी लागू केली होती. मात्र आता योग्य काळजी घेऊन पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्याची मुभा देण्यात आली आहे.


