Palghar News : गोळीच्या आवाजाने होमस्टे हादरलं! पालघरमध्ये ,17 वर्षांच्या मुलीला गळ्यात गोळी

•’डेट’साठी आले होते दोघं, पण क्षणात प्रेमकहाणीच झाली रक्तबंबाळ
पालघर :- पालघर जिल्ह्यातील केलवा परिसरात घडलेली ही घटना संपूर्ण परिसराला हादरवणारी आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. एकमेकांशी वेळ घालवण्यासाठी हे दोघं ‘राऊत रेसिडेन्सी’ या होमस्टेमध्ये आले होते. पण अवघ्या काही क्षणात सगळं बदललं… गोळीची एक दणकट आवाज, आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात!
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 18 वर्षीय प्रियकराकडे अवैध पिस्तूल होतं. मुलगी त्या पिस्तुलाकडे आकर्षित झाली होती. बिनधास्तपणे ती हाताळत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळी थेट तिच्या गळ्यात घुसली. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. नंतर तिला बोईसरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार केलवा येथील ‘राऊत रेसिडेन्सी’ या होमस्टेमध्ये घडला. मुलगी सध्या बोईसर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली असून त्याच्यावर अपहरण, खुनाचा प्रयत्न, तसेच शस्त्र कायद्यांतर्गत (आर्म्स अॅक्ट) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी सांगितले की, आरोपीकडे अनधिकृत पिस्तूल होते. ती पाहताना उत्सुकतेपोटी मुलीने ती हाताळायला सुरुवात केली आणि अचानक ट्रिगर दाबला गेला. गोळी थेट गळ्यात घुसली. पोलिसांनी तातडीने होमस्टेला धाव घेऊन मुलीला रुग्णालयात हलवले. बंदूक जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.
या प्रकरणात संबंधित होमस्टेने अल्पवयीन व्यक्तींसंबंधित नियमांचे पालन केले का, याची चौकशीही सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीकडून बंदुकीच्या माहितीसंदर्भात आधीपासून काही माहिती होती का, तसेच ती बंदूक यापूर्वी वापरण्यात आली होती का, याचाही तपास सुरू आहे.



