Maharaja Agrasen : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन जयंती उत्सवाचे आयोजन
20 वर्षात पहिल्यांदाच वाकडमध्ये साजरी होणार महाराजा अग्रसेन जयंती
पिंपरी चिंचवड : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा अग्रसेन Maharaja Agrasen यांच्या जयंती उत्सवाचे येत्या 03 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. अग्रवाल समाज, पार्क स्ट्रीट्स, वाकड यांच्या वतीने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून 20 वर्षात पहिल्यांदाच या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराजा अग्रसेन जयंती उत्सवापूर्वी दुपारी ४ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने अग्रवाल समाज सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा वाकड येथील गणेश मंदिरापासून सुरू होऊन पार्क स्ट्रीट, मेन सर्कल, विस्डम वर्ल्ड स्कूल जवळ गेट-बी येथे सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेची सांगता होईल. त्यानंतर हॉटेल ॲम्बियन्स एक्सेलन्सी, वाकड येथे महाराजा अग्रसेन यांचा जयंती उत्सव साजरा केला जाईल.
या दरम्यान, महाराजा अग्रसेन यांची पूजा व आरती केली जाईल. त्याच बरोबर 8 वी ते 12 वी व ग्रॅज्युएशन पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाईल. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी संगीत, नाट्य, कला, खेळ, शरीर सौष्ठव स्पर्धेत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले त्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल. याशिवाय 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. याच दिवशी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वालाही सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जयंती महोत्सवाच्या समारोपात मुंबई येथील अंध संगीतकारांच्या वतीने विनोदी कार्यक्रम, म्युझिकल नाईट्स आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.