Ekanth Shinde : ‘सगळ्यांसमोर भेटतो, लपून-छपून नाही’ – दिल्ली भेटीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

•उपमुख्यमंत्र्यांनी खासदारांसह अमित शाह यांची घेतली भेट; पंतप्रधान मोदींशीही चर्चा करणार
ANI :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदारांसह भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. थोड्याच वेळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
शिंदे यांनी सांगितले की, “आज मी सर्व खासदारांसोबत गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. खासदारांचे काही विषय होते, ते या भेटीत मांडले. गेल्या आठवड्यात मी दिल्लीत असताना अमित शाह यांना भेटलो नव्हतो. आजची भेट जाहीरपणे झाली आहे. मी लपून-छपून काहीही करत नाही, जे करतो ते सगळ्यांसमोर करतो.”
या भेटीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रकल्पांवरही चर्चा झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यांच्या या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडींना नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


