Varsha Gaikwad : राजकारणाचा ‘कबूतरखाना’! दादरच्या वादावरून खासदार वर्षा गायकवाड यांची भाजपवर जोरदार टीका

•’भाजपला प्रश्न सोडवायचा नाही, फक्त समाजाच्या भावना भडकावण्यात रस’, गायकवाड यांचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई :- दादरच्या कबुतरखान्यावर सुरू असलेल्या वादाने आज राजकीय वर्तुळात नवा धुरळा उडवला. एका बाजूला कबुतरखाना हटवण्यावरून जैन समाज आणि स्थानिकांमध्ये तणाव असतानाच, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘भाजपला हा प्रश्न सोडवायचा नाही, तर फक्त समाजाच्या भावनांशी खेळून आपली राजकीय पोळी भाजण्यात रस आहे,’ असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे.
त्यांनी भाजपच्या ‘दुटप्पी’ भूमिकेवर बोट ठेवताना अनेक उदाहरणे दिली. ‘विलेपार्ले येथील जैन मंदिरावर कारवाई झाल्यावर भाजपचे मंत्री आंदोलनात उतरतात. कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीला स्थलांतरित केल्यावर जनभावना विरोधात गेल्यावर फडणवीस सरकार लगेच कोर्टात जाण्याची भाषा करते,’ असे सांगत, गायकवाड यांनी भाजपच्या सोयीच्या राजकारणावर निशाणा साधला.
‘आपणच प्रश्न निर्माण करायचा, मग तो सोडवण्याचा दिखावा करायचा’
गायकवाड यांनी या संदर्भात दादरच्या कबुतरखान्याचा मुद्दा खास अधोरेखित केला. ‘एका बाजूला भाजपचा आमदार विधान परिषदेत कबुतरखान्यामुळे होणाऱ्या आजारांचा मुद्दा उपस्थित करतो आणि सरकार बंदीचा निर्णय घेते. पण दुसऱ्याच क्षणी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तो सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. हा काय प्रकार आहे?’ असा सवाल त्यांनी विचारला. ‘थोडक्यात काय, तर भाजप जाणूनबुजून समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे निर्णय घेते, प्रश्न निर्माण झाल्यावर त्यांच्यासोबत असल्याचा दिखावा करते आणि आपली राजकीय पोळी भाजून घेते,’ असे थेट आरोपही त्यांनी केले.
दादरमध्ये आज कायदा आणि सुव्यवस्थेची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप जबाबदार आहेत, असेही गायकवाड यांनी ठणकावून सांगितले. भाजपच्या या ‘राजकीय कबुतरखान्या’कडे सर्वांनी वेळेत लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.


