मुंबई

Kalyan News : दुर्गाडी किल्ल्यावर जाण्याची परवानगी नाकारली; शिवसैनिकांचा घंटानाद आंदोलनातून जोरदार विरोध!

•”नमाजास परवानगी, तर प्रार्थनेलाही का नाही?” असा सवाल शिवसैनिकांचा

कल्याण | बकरी ईदच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू भाविकांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ, शनिवारी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी संयुक्तपणे ‘घंटानाद आंदोलन’ करत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी नमाजासाठी मुस्लिम समाजाला परवानगी मिळत असताना, त्याच ठिकाणी हिंदू भाविकांना प्रार्थनेसाठी प्रवेश नाकारला जातो, ही दुजाभावाची वागणूक असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

कल्याणमधील लालचौकी येथे शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील, तर ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी, सचिन बासरे आणि महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक एकवटले होते. शिवाजी चौक ते लालचौकी असा मोर्चा काढत “दुर्गाडी किल्ला मुक्त करा” अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

पोलिसांनी रस्तारोधक लावून रोखले आंदोलन; दोन्ही गटातील कार्यकर्ते ताब्यात

पोलिसांनी लालचौकी येथे रस्तारोधक लावून दुर्गाडी किल्ल्याचा मार्ग बंद केल्याने, दोन्ही गटांचे शिवसैनिक आक्रमक झाले. काही कार्यकर्ते रस्तारोधक चढून पोलिसांचा बंदोबस्त तोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी कडवा प्रतिकार करत कोणालाही पुढे जाऊ दिले नाही. संतप्त शिवसैनिकांनी लालचौकी येथेच मोठ्या आवाजात आरती सुरू करत मनाई आदेशाचा भंग केला. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

दरम्यान, संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळपासून दुर्गाडी परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती, त्यामुळे मोठी कोंडी टळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0