Nerul Police News : नेरुळ पोलिसांचे धाडसी ‘कोंबिंग ऑपरेशन’! शस्त्रे, अमली पदार्थ आणि बांगलादेशी घुसखोरांसह 22 जणांना ठोकल्या बेड्या

Navi Mumbai Nerul Police Latest News : मध्यरात्री नेरुळचा कोपरा अन कोपरा पिंजून काढला; 100 पोलिसांच्या फौजफाट्याने अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले, गुन्हेगारांमध्ये मोठी घबराट
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक जरब बसवण्यासाठी परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडाकेबाज ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवण्यात आले. 10 मार्चच्या संध्याकाळपासून ते 11 मार्चच्या पहाटेपर्यंत चाललेल्या या विशेष मोहिमेत पोलिसांनी शस्त्रे, अमली पदार्थ आणि अवैध गुटख्याचा साठा जप्त करत एकूण 22 आरोपींविरुद्ध 19 गुन्हे दाखल केले आहेत. Navi Mumbai Police Latest News
या मोहिमेचे नेतृत्व नेरुळ पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी केले असून, 15 अधिकारी आणि 85 अंमलदार अशा एकूण 100 पोलिसांच्या ताफ्याने संपूर्ण परिसर पिंजून काढला. शिरवणे गाव आणि नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी पायी गस्त घालून नागरिकांशी संवाद साधला, ज्यामुळे सामान्य जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
चोरीच्या दुचाकीसह तलवारीची जप्ती
शिवाजी महाराज चौक आणि एअर इंडिया कॉलनी येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका चोरीच्या केटीएम (KTM) मोटरसायकलसह दोन आरोपींना ताब्यात घेतले. तपासात ही दुचाकी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे उघड झाले आहे. तसेच, एका आरोपीकडून बेकायदेशीर धारदार तलवार जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोन व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, जुगार, दारू आणि गुटखा विक्री करणाऱ्या 4 अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली. तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात ‘कोप्टा’ कायद्यांतर्गत 16 केसेस, तर अवैध गुटखा विक्रीची 1 केस नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत 3 बांगलादेशी घुसखोरांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दंड
नाकाबंदी दरम्यान 145 वाहनांची कसून तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 45 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हॉटेल आणि लॉजेसची देखील झाडाझडती घेण्यात आली असून अजामीनपात्र वॉरंट असलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.



