
Rupali Chakankar VS Rupali Thombare : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांवर टीका करणे ठोंबरेंना महागात; ‘कैलासवासी डॉक्टर मुंडेंच्या’ प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया
पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (NCP) गेल्या काही महिन्यांपासून दोन प्रमुख महिला नेत्यांमध्ये सुरू असलेला अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अखेर पक्षाने या वादात स्पष्ट भूमिका घेत, प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर शिस्तभंग नोटीशीचा बडगा उगारला आहे.
रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमक आणि स्पष्टवक्त्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी होती, मात्र त्यांचे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तसेच पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात जाहीर मतभेद समोर आले होते. रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा जाहीरपणे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर टीका केली होती. हेच त्यांना महागात पडल्याचे दिसत आहे.

पक्षाची शिस्तभंग नोटीस
मिळाल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. त्यांनी पक्षाला सात दिवसांत खुलासा देण्यास तयार असल्याचे सांगितले. “खुलासा देण्यासाठी 7 दिवसांचा कमी वेळ दिला आहे. हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवासी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देईन. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरंतर काय खुलासा द्यावा,” असे म्हणत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
या वादात गेल्या आठवड्यात माधवी खंडाळकर या महिलेने फेसबुक लाईव्हद्वारे रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुंड पाठवून मारहाण केल्याचा दावा केला होता, जो तिने नंतर मागे घेतला. यानंतर तिसऱ्या व्हिडीओत तिने दुसरा व्हिडीओ दबावाखाली केला, असे म्हटले. याचवेळी रुपाली ठोंबरे पाटील यांनी माधवी खंडाळकर यांना रुपाली चाकणकर यांनीच फूस लावल्याचा थेट आरोप केला होता.
राष्ट्रवादीतील या ‘रूपाली Vs रूपाली’ वादावर पक्ष आता काय भूमिका घेतो आणि रुपाली ठोंबरे आपल्या आरोपांवर काय सविस्तर खुलासा देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



