मुंबई

NCP Chandrakant Patil : राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला मोठा धक्का! नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुलासह ‘शिंदे सेनेत’ प्रवेश

NCP Member Chandrakant Patil Joined Shinde Shivsena : जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी’ उपमुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा निर्णय; माथाडी आणि प्रकल्पग्रस्त युनियनमध्ये सक्रिय असलेल्या पाटलांचा पक्षांतराचा निर्णय.

नवी मुंबई :– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील NCP Chandrakant Patil यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा विनीत चंद्रकांत पाटील आणि काही प्रमुख सहकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे, ज्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

माजी आमदार आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त तसेच माथाडी युनियनमध्ये चंद्रकांत पाटील यांचा पूर्वीपासून मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

प्रवेशाचे कारण: ‘जनतेचे प्रश्न’

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्या नवी मुंबईकरांसाठी आणि माथाडींच्या समस्या सोडवण्यासाठी मी काम करतो, त्या समस्या मार्गी लावण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

“मी अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करत होतो. मला जाणवले की ते लोकांसांठी धावून जातात, पक्षपात न करता जनतेची कामे करतात. प्रकल्पग्रस्तांचे आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे यांची नक्कीच मदत होईल. ज्या ठिकाणी मदत होते त्यांच्यासोबत काम केल्यास सोईस्कर होईल, म्हणून हा निर्णय घेतला,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

‘राष्ट्रवादीवर नाराजी नाही’

विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी किंवा कोणाविषयी कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ जनतेच्या प्रश्नांसाठी हा पक्षप्रवेश केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या स्थानिक नेत्याच्या प्रवेशामुळे नवी मुंबईच्या राजकारणात नवीन समीकरणे आणि बदल घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पक्षप्रवेशावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के, उपजिल्हाप्रमुख सुरेश कुककर्णी आणि विलास भोईर उपस्थित होते.

vivek

Recent Posts