Navratri 2025 : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी; शिवाजी महाराजांना तलवार देणारी, मराठा साम्राज्याची प्रेरणा

•तुळजापूरचे मंदिर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक; इतिहास आणि भक्तीचा संगम
नवरात्र स्पेशल 2025, तुळजापूर :- छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या देवीने स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद आणि भवानी तलवार दिली, ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी! मराठा साम्राज्याची प्रेरणास्थान आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले हे तुळजाभवानी मंदिर आजही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बालाघाटच्या उंच कड्यावर वसलेल्या या मंदिराचा इतिहास आणि इथे साजरा होणारा उत्सव हा केवळ धार्मिकच नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
इतिहासकारांच्या मते, तुळजाभवानी मंदिर राष्ट्रकूट किंवा यादवकालीन आहे. मंदिराच्या रचनेवर हेमाडपंती शैलीचा प्रभाव दिसतो. सर्वात जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे 1397 साली सापडला आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी राजे शहाजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वार ही दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत, जे या मंदिराच्या मराठा साम्राज्याशी असलेल्या संबंधाची साक्ष देतात.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक गोमुख तीर्थ आणि कल्लोळ तीर्थ येथे स्नान करतात. इथेच सिद्धीविनायक, मातंगी, यमाई देवी आणि खंडोबाची मंदिरे आहेत, ज्यामुळे एकाच ठिकाणी अनेक देवांचे दर्शन घेण्याची सोय झाली आहे.
देवीची स्वयंभू मूर्ती आणि तिचे वैशिष्ट्य
मंदिराच्या गाभाऱ्यातील तीन फूट उंचीची, काळ्या पाषाणाची अष्टभुजा महिषासूरमर्दिनीची स्वयंभू मूर्ती पाहून भाविक नतमस्तक होतात. देवीच्या आठ हातांमध्ये त्रिशूळ, बाण, चक्र, शंख अशी शस्त्रे आहेत, तर तिचा उजवा पाय महिषासूर राक्षसावर आहे. या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती ‘चल मूर्ती’ आहे.
उत्सवांची परंपरा
तुळजाभवानी मंदिरात दसरा आणि रंगपंचमी हे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे होतात. दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन उत्सवामध्ये देवीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. यावेळी भाविक मोठ्या भक्तिभावाने हळदी-कुंकवाची उधळण करतात. याचप्रमाणे रंगपंचमीचा उत्सवही इथे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो, ज्यात हजारो भाविक सहभागी होतात.



