मुंबई

Navratri 2024 : महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं,तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड व सप्तश्रुंगी वणी

• राज्यात नवरात्री महोत्सवाला प्रारंभ, राज्यात प्रमुख देवीचे जागृत स्थान

मुंबई :- नवरात्रीचा पवित्र उत्सव प्रारंभ झाला आहे. या दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. देशात देवीची 51 शक्तीपीठं आहेत. तर, महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड व सप्तश्रुंगी वणी. मोठ्या संख्येने नवरात्राच्या दरम्यान दुर्गा भक्त या श्रद्धास्थानी जात असतात. या प्रत्येक देवीचे महत्व आणि त्याचा इतिहास फार वेगळा आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

तुळजापूर
मंदाकिनी नदीकाठी तप करताना ‘अनुभूती’ वर कुक्कर राक्षसाने हल्ला केला तेव्हा तिने जगदंबेला हाक मारली. देवी त्वरीत प्रकट झाली व तिने राक्षसाला ठार मारले. देवी त्वरीत आली म्हणून तिला ‘त्वरीता’ नाव मिळाले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तुरजा, तुळजा झाले. हीच तुळजापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानी होय.

कोल्हापूर
ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासूर व त्याचा मुलगा करवीर हे लोकांना फार छळू लागले. सर्वांच्या इच्छेनुसार शंकराने करवीराचा वध केला तेव्हा कोल्हासूराने चिडून सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली. लोकांनी जगदंबेचा धावा केला. देवीने त्वरीत प्रकट होऊन कोल्हासूराचा वध केला. देवीकडे त्याने मृत्यूपूर्वी माझ्या नावाबरोबर तसेच आपल्या नावामागे आपल्या मुलाचे नाव यावे असे वरदान मागितल्याने ‘करवीर’ निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी’ या नावाने देवी प्रसिद्ध झाली.

माहूरगड
जमदग्नीची पत्नी रेणुका आणि पुत्राचे नाव भगवान परशुराम. कार्तवीर्य राजाने जमदग्नीकडे कामधेनूची मागणी केली. ‘कामधेनू’ दिली नाही म्हणून कार्तवीर्य राजाने जमदग्नींचा वध केला तेव्हा परशुरामाने कार्तवीर्य याच्या वधाबरोबरचं 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली असं म्हणतात. परशुराम एका पारड्यात आई व दुसऱ्या पारड्यात वडिलांचा मृतदेह ठेवून ती कावड घेऊन माहूरगड येथे आले. तेव्हा हे परशुरामा तू येथेच थांब अशी आकाशवाणी झाली. परशुरामाने वडिलांच्या चितेला अग्नी दिला. मात्र त्या चित्तेत माता रेणुकानेही उडी मारली व भगवान परशुरामास एक महिन्याने परत ये, असे सांगितले. परशुरामाला आईची खूप आठवण येताच माता रेणुका कमरेपर्यंत बाहेर आल्या. हीच माहूरगडची रेणूकादेवी. येथे प्रभू भगवान दत्तात्रयांचे निद्रास्थान देखील आहे.

सप्तश्रृंगी वणी
हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचे 7 तुकडे येथे पडले. या पर्वतावर देवीने महिषासुराचा वध केला व नंतर तेथेच वास्तव्य केले. हा वणीचा डोंगर प्रसिद्ध आहे. ही देवी 18 हातांची. 8 फूट उंच आहे. ‘दुल्लभसेठ’ या गुजराथी व्यापाऱ्यासाठी ही देवी पुण्यात चतुःश्रुंगी येथे आली आहे. शारदीय नवरात्रीत याच साडेतीन शक्तीपीठावर देवीचा उत्सव व जागर केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0