Navi Mumbai Robbery News : नवरात्र उत्सवाच्या धामधुमीत ‘अतिसुरक्षित’ सोसायटीत 11 लाखांची घरफोडी! कामोठेतील गिरीराज सोसायटीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Navratri Robbery News : गरब्यासाठी दरवाजा उघडा ठेवून कुटुंब गेले, नेमकी त्याच वेळी 11 लाखांचे दागिने लंपास झाल्याचा तक्रारदार महिलेचा संशय
कामोठे (नवी मुंबई) :- अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीत चोरीचा थरार समोर आला आहे. कामोठे सेक्टर 35 येथील गिरीराज को-ऑप. सोसायटीमधील एका सदनिकेतून तब्बल 11 लाख 81 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. विशेष म्हणजे, सोसायटीत सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत ही चोरी झाली असून, सोसायटीतील सुरक्षा व्यवस्थेवर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. Navi Mumbai Crime News
सेक्टर 35 मधील गिरीराज सोसायटीची ओळख शहरात एक अतिसुरक्षित गृहनिर्माण सोसायटी म्हणून आहे. येथे 24 तास सुरक्षा रक्षक आणि अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. याच सोसायटीच्या 13 व्या मजल्यावर बांधकाम व्यावसायिक विलास मस्कर यांचे कुटुंब राहते. विलास यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, 16 ते 27 सप्टेंबर या 11 दिवसांच्या कालावधीत ही चोरी झाली असल्याचा संशय आहे. Navi Mumbai Robbery News
गरबा कार्यक्रमादरम्यान चोरीचा संशय
चोरी नक्की कधी झाली आणि कोणी केली याची माहिती तक्रारदार कुटुंबाला कळू शकली नाही. मात्र, सोसायटीच्या आवारात गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मस्कर कुटुंब दरवाजा उघडा ठेऊन गरब्यात सामील होण्यासाठी गेले असता, ही चोरी झाली असावी, असा कयास तक्रारदार महिलेने व्यक्त केला आहे.
या अज्ञात चोरट्याने घरातील 222.35 ग्रॅम वजनाचे 11 लाख 81 हजार 859 रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी शनिवारी कामोठे पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस तपासाचे लक्ष ‘इनसाइडर’वर
11 दिवसांच्या कालावधीत इमारतीमध्ये ये-जा करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. सोसायटीत सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वीच कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा प्रचारही सुरू होता. या दोन्ही कारणांमुळे इमारतीमध्ये सदनिकाधारक आणि इतरांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात पोलिसांना सतावणारा मुख्य प्रश्न हा आहे की, घरातील 11 लाखांचे सोने नेमके कोणत्या ठिकाणी ठेवले होते, याची माहिती चोराला कशी मिळाली? याचाच अर्थ चोरट्याने कुटुंबाच्या हालचाली टिपून, माहितीच्या आधारे चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखा व गुन्हे प्रकटीकरण विभाग या चोरीचा कसून शोध घेत आहेत.


