मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणणाऱ्यांवर मुख्यमंत्री गप्प का?”; अण्णामलाईंच्या विधानावरून संजय राऊतांचा संताप

Sanjay Raut On BJP : अण्णामलाईंचे ‘बॉम्बे’ प्रेम आणि ‘ग्लोबल सिटी’च्या व्याख्येवरून नवा वाद; भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर राऊतांनी ओढले ताशेरे

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election 2026) मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच, भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. “बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असे अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत म्हटले. या विधानानंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका करत, “तुमच्याच पक्षाचे पुढारी मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणतात, यावर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.

नेमके काय म्हणाले अण्णामलाई?

प्रभाक क्र. 47 मध्ये प्रचारासाठी आलेले अण्णामलाई एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, “मुंबईकरांना आता ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये स्थानिक सत्ता दुसऱ्या पक्षाची आणि केंद्रात भाजपची आहे. पण मुंबईत केंद्र, राज्य आणि महापालिकेतही भाजपची सत्ता येणे शक्य आहे.” पुढे बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले की, “बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही. हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथल्या महापालिकेचे बजेट 75 हजार कोटी रुपये आहे, जे चेन्नई (8 हजार कोटी) आणि बंगळुरू (19 हजार कोटी) पेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे या शहरासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे.”

संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर प्रहार

अण्णामलाईंच्या या विधानावर आज सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत आक्रमक झाले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणे आहे? देवेंद्र फडणवीस गर्जना करतात की सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही. मग तुमच्याच पक्षाचे स्टार प्रचारक इथे येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही, असे उघडपणे कसे काय बोलू शकतात? मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि ती मिळवण्यासाठी 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले आहे, याचा विसर भाजपला पडला आहे का?”

मराठी विरुद्ध अमराठी वादाला फोडणी

ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर ‘मुंबई वाचवा’ अशी साद मराठी मतदारांना घातली जात आहे. अशातच अण्णामलाई यांनी मुंबईच्या ७५ हजार कोटींच्या बजेटचा उल्लेख करत तिला ‘आंतरराष्ट्रीय शहर’ संबोधल्याने, मुंबईवर केंद्राचा आणि परप्रांतीय नेत्यांचा डोळा असल्याचा आरोप विरोधकांनी अधिक तीव्र केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0