
Navi Mumbai Latest News : बेलापूरमधील धक्कादायक घटना; सागरी सुरक्षा पोलिसांमुळे महिलेचा जीव वाचला, ‘अंधविश्वास’ घातक ठरल्याची चर्चा.
नवी मुंबई: तंत्रज्ञानावर जास्त विसंबून राहणं कधीकधी कसं महागात पडू शकतं, याचा प्रत्यय शुक्रवारी पहाटे बेलापूरमध्ये आला. गुगल मॅपवर दाखवलेल्या दिशांवर विश्वास ठेवून कार चालवत असलेली एक महिला थेट खाडीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, प्रसंगावधान राखून सागरी सुरक्षा पोलिसांनी तात्काळ मदतीचा हात दिला आणि महिलेचा जीव वाचला. Navi Mumbai Latest News
ही घटना शुक्रवारी (25 जुलै) मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित महिला आपल्या कारने उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपने तिला सरळ रस्ता दाखवला, त्यामुळे तिने पुलावरून न जाता, खालील पर्यायी मार्ग निवडला. मात्र, हा मार्ग थेट ध्रुवतारा जेट्टीकडे जात असल्याने, तिची कार अनपेक्षितपणे खाडीच्या पाण्यात कोसळली.
जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली. त्यांनी जराही वेळ न घालवता बोटीच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यात अडकलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. अपघातग्रस्त कारलाही नंतर क्रेनच्या सहाय्याने खाडीतून बाहेर काढण्यात आले. ही घटना थेट सागरी पोलिस चौकीसमोरच घडल्याने वेळेवर मदत पोहोचली आणि एक मोठा अनर्थ टळला.
गुगल मॅपवर ‘अंधविश्वास’ नको: स्थानिक माहितीही गरजेची
या घटनेने पुन्हा एकदा गुगल मॅपच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात आणि अनोळखी ठिकाणी मार्ग शोधण्यासाठी गुगल मॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो खरा, पण यातील माहिती अनेक वेळा अद्ययावत नसते. गुगल मॅपवरील रस्त्यांची माहिती प्रामुख्याने उपग्रह चित्रे, वापरकर्त्यांच्या लोकेशन डेटा आणि स्वयंसेवक वापरकर्त्यांच्या (गुगल मॅप्स कॉन्ट्रीब्युटर्स) फीडबॅकवर आधारित असते. त्यामुळे नव्याने बांधलेले रस्ते, बंद झालेले मार्ग किंवा सार्वजनिक वापरासाठी नसलेल्या मार्गांची माहिती वेळेवर अपडेट होत नाही.
ध्रुवतारा जेट्टीकडे जाणारा रस्ता हा सार्वजनिक वाहतुकीसाठी नाही, तरीही तो मॅपवर दर्शवला गेल्याने हा अपघात घडला. विशेषतः रात्रीच्या वेळी दिशांची स्पष्टता नसताना, अशा चुकीच्या मार्गांमुळे गंभीर अपघात होण्याचा धोका वाढतो. गुगल मॅपवरील माहिती अधिक अचूक होण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरी संस्थांनी रस्ते, पूल, अडथळे, जेट्टी यांसारख्या बाबींची माहिती गुगल मॅपला पाठवल्यास अशा चुका कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे, नागरिकांनीही चुकीच्या माहितीबाबत ‘फीडबॅक’ देणे गरजेचे आहे, ज्यामुळे इतरांचे संभाव्य धोके टाळता येतील.



