मुंबई

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलिसांचा ‘रबाळे’ परिसरात मोठा दणका! कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि अमली पदार्थांचा साठा जप्त

पोलीस आयुक्तांच्या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले; 200 हून अधिक पोलिसांच्या ताफ्याने रबाळे, घणसोली परिसर पिंजून काढला

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरोधात पुकारलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ युद्धाचा प्रत्यय पुन्हा एकदा रबाळे परिसरात पाहायला मिळाला. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री राबविण्यात आलेल्या धडक कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह बेड्या ठोकल्या आहेत. या मोहिमेत पोलिसांनी केवळ शस्त्रेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठाही हस्तगत केला असून यामुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडले आहे.

पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-1 मधील 7 पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि सुमारे 184 पोलीस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. रात्रीच्या वेळी नोसिल नाका, अर्जुनवाडी, घणसोली साईनाथवाडी आणि रबाळे या संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी एकाच वेळी ‘मास रेड’ करून परिसराची नाकेबंदी केली. या कारवाईदरम्यान एका संशयास्पद आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. धक्कादायक बाब म्हणजे, याच आरोपीच्या ताब्यातून अमली पदार्थ विरोधी पथकाने ‘ब्राऊन शुगर’च्या 100 पुड्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित आरोपीवर शस्त्रास्त्र कायदा आणि एनडीपीएस (NDPS) कलमान्वये कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केवळ शस्त्रास्त्रेच नाही, तर या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी अवैध दारू विक्री, गुटखा विक्री आणि ड्रग्ज सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाईचा बडगा उगारला आहे. एकूण 14 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून, नाकाबंदी दरम्यान 229 वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यातील 92 वाहनधारकांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, शहरातील लॉजेस आणि हॉटेल्सची तपासणी करून संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यात आली.

अभिलेख वरील 22 गुन्हेगारांची

पडताळणी करत असताना पोलिसांनी एका फरार आरोपीलाही बेड्या ठोकण्यात यश मिळवले आहे. या मोहिमेत अवैध वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांचीही कसून तपासणी करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत आणि सचिन गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. नवी मुंबई शहरात गुन्हेगारीला थारा मिळणार नाही आणि अशा प्रकारच्या धडक मोहिमा सातत्याने सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0