Navi Mumbai Murder Arrested : पत्नीच्या हत्येतील आरोपी 6 वर्षांनी हैद्राबादमधून जेरबंद; पुरावे मिटवून ‘पिंटू सिंग’ बनून राहत होता, मुलांची झाली होती वाताहत!

Navi Mumbai Police Latest News : 4 डिसेंबर 2019 च्या गुन्ह्याचा अखेर छडा; बंद झालेली केस पुन्हा उघडली, पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश
पनवेल,कामोठे :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला रॉकेल ओतून पेटवून दिलेल्या आरोपी पतीला तब्बल सहा वर्षांनंतर कामोठे पोलिसांनी Navi Mumbai Kamothe Police हैद्राबाद येथून अटक केली आहे. आरोपी मनोहर सरोदे हा गेली अनेक वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता आणि नाव बदलून ‘पिंटू सिंग’ या नावाने राहत होता. या घटनेमुळे सहा वर्षांपूर्वी अनाथ झालेल्या मुलांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. Navi Mumbai Latest Crime News
ही हृदयद्रावक घटना 4 डिसेंबर 2019 रोजी कामोठेतील जुई गावात घडली होती. मनोहर सरोदे याने दारूच्या नशेत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला रॉकेल टाकून पेटवून दिले. या घटनेनंतर तो लगेच फरार झाला, तर त्याच्या पत्नीचा पाच दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या दोन मुलांची वाताहत झाली आणि त्यांना अनाथ आश्रमात राहावे लागले.
या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी मनोहरचा शोध सुरू केला, परंतु त्याला पकडण्यात यश आले नाही. एकदा तो आपल्या मूळ गावी नांदेडला गेल्यावर त्याचे वडील त्याला पोलिसांकडे घेऊन जात असल्याचे समजल्यावर तो तिथूनही पळाला. पोलिसांच्या विविध पथकांनी प्रयत्न करूनही तो सापडला नाही, त्यामुळे 2023 मध्ये ही केस बंद करण्यात आली होती.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पुन्हा तपास सुरू

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जुन्या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांना ही बंद झालेली केस पुन्हा तपासण्याचे निर्देश दिले.
पोलीस अधिकारी तायडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत मनोहरच्या दूरच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मनोहरने नाव बदलून हैद्राबादमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या मुलीच्या आणि जावयाच्या फोनवर पाळत ठेवून दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना अखेर मनोहरचा मोबाईल नंबर सापडला. या नंबरच्या आधारावर त्याचा हैद्राबादमधील जहांगिराबाद येथील पत्ता पोलिसांना मिळाला.
शनिवारी 50 वर्षीय मनोहरला अटक करून पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने दारूच्या नशेत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने त्याला पुढील चौकशीसाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भूसा गाडीवर क्लिनरचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. सहा वर्षांनंतर मिळालेल्या या यशामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.


