भाजपला नवी मुंबई जोरदार धक्का, संदीप नाईक यांनी भाजपाला केली सोडचिठ्ठी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची तुतारी घेतली हाती
•वडील गणेश नाईक यांना भाजपाकडून उमेदवारी तर मुलगा संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात
नवी मुंबई :- नवी मुंबईत नाईक कुटुंब यांचे एक वेगळेच अस्तित्व आहे. राज्याच्या राजकारणातील तसेच नवी मुंबईच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाचे नाव म्हणून नाईक कुटुंबीय यांना पाहिले जाते. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने जाहीर केलेल्या 99 उमेदवारांच्या यादीत ऐरोली विधानसभेतून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली तर बेलापूर विधानसभेतून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने नाराज संदीप नाईक यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. नाईक कुटुंब मागील काही दिवसांपासून भाजपापासून दूर राहणार असून यंदाच्या निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होते. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते अशी चर्चा सर्वत्र होती.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या यादीत भाजपकडून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली त्यामुळे पुत्र संदीप नाईक नाराज होऊन यांनी आज अखेर भाजपाला आपल्या राजीनामा सुपूर्त करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरुद्ध संदीप नाईक उभे राहून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.विधानसभा निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधीच मी संदीप नाईकांच्या हातात तुतारी दिली असल्याचे सूचक वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. या मतदारसंघात तुमच्या मनातील उमेदवार देऊ असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.
संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक हे भाजपचे मोठे नेते असून पक्षाने त्यांना ऐरोली विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तर संदीप यांना नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. मात्र पक्षाने या जागेवरून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.