
Navi Mumbai Bitcom Company Latest Fire News : ‘बिटाकेम’ कंपनीत दुपारच्या सुमारास आग भडकली; महापे, ऐरोलीसह वाशीतून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
नवी मुंबई l नवी मुंबईतील महापे औद्योगिक क्षेत्रात (MIDC) शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ‘बिटाकेम’ (Betachem) असे आग लागलेल्या कंपनीचे नाव असून, केमिकलच्या साठ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. Navi Mumbai Latest Fire News
धुराच्या लोटांमुळे परिसरात अंधार महापे एमआयडीसीतील पावणे भागात, प्लॉट क्रमांक डब्ल्यू-१७७ वर ही कंपनी स्थित आहे. केमिकलला आग लागल्यामुळे काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले. कंपनीतून निघणारे काळ्या धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. आगीची तीव्रता इतकी मोठी आहे की, परिसरातील कामगार आणि स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अग्निशमन दलाचा फौजफाटा तैनात घटनेची माहिती मिळताच महापे, ऐरोली आणि वाशी येथील अग्निशमन केंद्रांच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. केमिकल कंपनी असल्याने आग अधिक पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पाण्याचे फवारे आणि विशेष फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कंपनीत कोणी कामगार अडकले आहेत का, याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
खबरदारी म्हणून परिसर रिकामा केमिकलच्या संपर्कामुळे आग लागून स्फोट होण्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीच्या आसपासचा परिसर रिकामा केला आहे. महापे-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीवरही याचा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र आग विझवण्याला सध्या प्राधान्य दिले जात आहे.



