Navi Mumbai Crime News : पावसाळी विधानसभा अधिवेशन संपताच नवी मुंबई, पनवेल परिसरात अवैध धंद्याचे पुनर्वसन
स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, प्रशांत ठाकूर यांच्या भूमिकेकडे नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांचे लक्ष
नवी मुंबई जितिन शेट्टी : नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची निवड झाल्यावर आयुक्तालय परिसरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जुगार, मटका, हुक्का पार्लर, डान्सबार अवैध धंद्यांना यांसारख्या आळा बसल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, पुन्हा एकदा नवी मुंबई पनवेल परिसरात अवैध धंद्यांनाऊत आल्याचे पहावयास मिळत आहे. पावसाळी अधिवेशन काळात सर्वच अवैध धंदे पूर्णपणे बंद होते, पण पावसाळी विधानसभा अधिवेशन संपताच सर्व अवैध धंदे नवी मुंबई पनवेल परिसरात जोरात सुरू झाले आहेत.
नवी मुंबई पोलिस आयुक्त अवैध धंद्यांची पाठराखण करतात का?
नवी मुंबई पनवेल परिसरात जुगाराचे अड्डे, हुक्का पार्लर, पोलिसांच्या कारवाईला आणि शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवून, अंमली पदार्थांची आणि गुटख्याची सुरु असलेली विक्री, मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेले वेश्या व्यवसाय आणि बियर शॉपीच्या नावावर खुलेआम केले जाणारे मद्यपान रोखण्यात नवी मुंबई-पनवेल पोलीसांना अद्याप अपयश आले असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच बेकायदेशीर आणि अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्त या अवैध धंद्याविरोधात तात्पुरती कारवाई करून इतर वेळी पाठराखण करतात का? असा प्रश्न सर्वसामान्यांना उपस्थित झाला आहे. नवी मुंबई आणि पनवेल चे आमदार मंदा म्हात्रे आणि प्रशांत ठाकूर यांनी कारवाईबाबत अद्यापही कोणती स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची काय भूमिका असेल याकडे जनसामान्याचे लक्ष लागले आहे.