Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत फर्जी सिनेमाचा ट्रेलर ; युट्युब वर प्रशिक्षण घेऊन तरुणाने बनवल्या बनावटी नोटा
•नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; बनावट नोटा तयार करणाऱ्या तरुणाला अटक, संगणक आणि प्रिंटर द्वारे तयार करत होता नोटा
नवी मुंबई :- अभिनेता शाहिद कपूर यांचा काही दिवसांपूर्वी बनावट नोटांच्या तयार कसे करतात यावर आधारित फर्जी नावाचा चित्रपट आला होता त्याच धर्तीवर नवी मुंबईच्या तळोजा परिसरात बनावट नोटा तयार करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातून घरातच बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल पाटील (26 वर्ष) असे आरोपीचे नाव असून दोन लाख तीन हजारांच्या नोटांसह लागणारे साहित्य जप्त केले आहे.
तळोजा एमआयडीसीतील तोंडरे गावात राहणारा प्रफुल्ल पाटील संगणक व प्रिंटरद्वारे तयार केलेल्या बनावट नोटा एजंटमार्फत बाजारात चलनात आणत होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती.
आरोपी प्रफुल्ल पाटील हा नववी नापास आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये संगणक प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छापणाऱ्यांची माहिती युटयुबवर त्याला मिळाली होती. या माहितीवरून त्याने तळोजा येथील घरामध्ये बनावट नोटा छापण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले आहे.
त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (15 मे) दुपारी छापा मारला होता. यावेळी पोलिसांना दोन लाख तीन हजार 200 रुपयांच्या 50,100 आणि 200 रुपयांच्या छापलेल्या नोटा सापडल्या. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अशाच पद्धतीने नोटा तयार केल्या आहेत. त्यामुळे किती नोटा चलनात आल्या आहेत, याचा तपास सुरू आहे. तळोजा पोलीस ठाणे, येथे आरोपी यांच्यावर भादवि कलम 489 अ,489ब, 489 क, 489,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आज 17 मे रोजी दुसरा आरोपी प्रतीक येळे, (19 वर्ष) (राह- एल आय जी कॉलनी, कळंबोली) यास अटक केली असून त्यास रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमित काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम, सहाय्यक पोलीस फौजदार मंगेश वाट, पोलीस नाईक सचिन टिके, महेश आहिरे, सतिश चव्हाण, पोलीस शिपाई नितीन परोडवाड नवी मुंबई यांनी केली आहे.