Navi Mumbai Crime News : सिडको नवी मुंबईत ३.५ लाखांची लाच घेताना शिपाई रंगेहात – तीन अधिकारी व एक खाजगी इसमाविरुद्ध गुन्हा

नवी मुंबई | १० सप्टेंबर २०२५ :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई युनिटने केलेल्या कारवाईत सहनिबंधक सहकारी संस्था, सिडको, नवी मुंबई कार्यालयातील शिपाई महेश गंगाराम कामोठकर याला ३.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी कार्यालयीन सहायक राहुल रंगराव कांबळे, सहकार अधिकारी धनाजी दत्तात्रय काळुखे, खाजगी इसम किशोर शंकरराव मोरे यांच्यासह कामोठकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार (वय ५४ वर्षे) हे सेक्टर ९, वाशी येथील नूर को-ऑप. हौसिंग सोसायटीचे रहिवासी असून ते सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. सोसायटीच्या निवडणुका, सदस्यांचे राजीनामे आणि वार्षिक सर्वसाधारण सभेतील त्रुटींवरून सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयात विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील एका प्रकरणाचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने द्यावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ५ लाखांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३.५ लाखांवर निश्चित करण्यात आली.
१२, १४, २१ आणि २२ ऑगस्ट २०२५ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज (१० सप्टेंबर २०२५) सापळा लावण्यात आला. त्यावेळी आरोपी राहुल कांबळे यांनी शिपाई महेश कामोठकर याला रक्कम स्वीकारण्यास सांगितले. कामोठकर यांनी तक्रारदाराकडून ३.५ लाख रुपये स्वीकारताच लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहात पकडले.
या प्रकरणी आरोपी लोकसेवक व खाजगी इसमाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७, ७ (अ) व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकारी व पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ यांच्यासह नितीन पवार, भरत गिरासे, रतन गायकवाड, योगेश नाईक, विशाल अहिरे, पल्लवी कदम, दिपाली सावंत व योगिता चाळके सहभागी होते.
वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवराज पाटील (पोलिस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र) तसेच अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
नागरिकांना आवाहन
अँटी करप्शन ब्युरोकडून रायगड, ठाणे व नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट लाचेची मागणी करत असल्यास त्वरित विभागाशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक : ०२२-२५४२७९७९ / टोल फ्री १०६४.


