मुंबई

Navi Mumbai Crime News : दारूच्या नशेत वादानंतर रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला; कामोठ्यात खळबळ

“दारूच्या नशेत वाद, तक्रारीनंतर संतप्त हल्ला; युवकावर कोयत्याने वार”

कामोठे, नवी मुंबई : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात होऊन एका तरुण रिक्षाचालकाला कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची घटना कामोठेतील धाकटा खांदागाव भागात घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावेश भगवान म्हात्रे (२५), हे नेहमीप्रमाणे आपल्या गावात राहात असून वडिलांसोबत रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. १३ मे रोजी रात्री ८ वाजता गावातील आयान शेख हा दारूच्या नशेत गोंधळ घालत होता. भावेश यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने शिवीगाळ केल्याने भावेश यांनी त्याच्या कुटुंबियांकडे तक्रार केली होती.

त्याच रात्री ११ वाजता भावेश मत्स शेतीजवळील गोठ्यात बैलांना वैरण घालण्यासाठी गेले असता, आयान शेखचा मित्र सौरव उर्फ गौरव म्हात्रे, गणपत आणि त्यांच्यासोबत असलेल्या एक अनोळखी तरुणाने त्यांना घेरले. ‘आमच्या मित्राच्या घरी तक्रार का केलीस?’ असे म्हणत सौरवने कोयत्याने चेहऱ्यावर वार केला. गणपतने लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि अनोळखी इसमाने डोक्यावर वार केला. या हल्ल्यात भावेश यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर व दोन्ही हातांवर गंभीर जखमा झाल्या.

घटनेनंतर भावेश यांचे मित्र सुयोग म्हात्रे व विशाल प्रसाद यांनी त्यांना तातडीने MGM हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी सौरव उर्फ गौरव म्हात्रे, गणपत, आयान शेख व एक अनोळखी इसम यांच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

vivek

Recent Posts