•बेलापूरच्या हॉटेलबाहेर एसीबीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; दोन खाजगी दलालांसह बड्या अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
नवी मुंबई | सर्वसामान्यांच्या तांदळावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट साखळीचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे. कोकण विभागाचे पुरवठा उपायुक्त (वर्ग 1) अनिल सुधाकर टाकसाळे यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीच्या पथकाने नवी मुंबईत रंगेहात पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, टाकसाळे यांनी सरकारी कामासाठी चक्क खाजगी व्यक्तींची नेमणूक केली होती, ज्यांच्या माध्यमातून लाचेचे व्यवहार चालवले जात होते. या कारवाईत साई प्रतिम अमिन आणि राजा गणेश थेवर या दोन खाजगी इसमांनाही अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी भिवंडीतील एका तांदूळ गोदामावरील कारवाईशी संबंधित आहे. तक्रारदार यांचा ‘आई एकविरा ट्रेडिंग कंपनी’ नावाने तांदूळ विक्रीचा व्यवसाय आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी उपायुक्त टाकसाळे आणि त्यांच्या पथकाने या गोदामावर धाड टाकून अवैध साठा असल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी, सुनावणीच्या वेळी मदत करण्यासाठी आणि भविष्यात व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी टाकसाळे यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. ‘गुड लक’ म्हणून 5 लाख रुपये रोख आणि दरमहा 1 लाख 50 हजार रुपयांचा हप्ता अशा स्वरूपाची ही मागणी होती.
तक्रारदाराने या भ्रष्टाचाराला बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 5 जानेवारी रोजी तक्रार प्राप्त होताच विभागाने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. 7 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये लाचेची मागणी सिद्ध झाली. त्यानंतर आज 12 जानेवारी रोजी सीबीडी बेलापूर येथील हॉटेल लक्ष्मी परिसरात सापळा रचण्यात आला. दुपारीच्या दरम्यान हॉटेलसमोरील फूटपाथवर तक्रारदाराकडून 5 लाखांची रोकड स्वीकारताना राजा थेवर याला पकडण्यात आले. त्यानंतर लगेचच त्याचा साथीदार साई अमिन याला ताब्यात घेऊन या साखळीचा मुख्य सूत्रधार असलेले उपायुक्त अनिल टाकसाळे यांना कोकण भवन येथून अटक करण्यात आली.
अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे शासकीय कार्यालयांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. एका बाजूला प्रशासन पारदर्शकतेचा दावा करत असताना, दुसरीकडे वर्ग चा अधिकारी खाजगी हस्तकांमार्फत हप्तेखोरी करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…