Torres Fraud : “झगमगाटाच्या आड दगाफटका! ‘टोरेस ज्वेलर्स’कडून करोडोंची फसवणूक उघड”

हिऱ्याच्या नावाखाली मोजेनाईट विक्री, आठवड्याला परतावा व लकी ड्रॉचे आमिष
कल्याण :- कल्याण खडकपाडा परिसरात झगमगणाऱ्या ‘टोरेस ज्वेलर्स’ शोरूमने नागरिकांच्या विश्वासाला तडा दिला आहे. सोनं, चांदी व हिऱ्यासारखे दिसणारे मोजेनाईट खडे विकून ग्राहकांना भरघोस परताव्याचं आणि लकी ड्रॉमधून गाडी, घर मिळवण्याचं स्वप्न दाखवत हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची गुंतवणूक उभी केली.
प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीच्या बॅनरखाली ग्राहकांना “दर आठवड्याला 4% ते 11% परतावा 52 आठवड्यांसाठी” देण्याचे आश्वासन देण्यात आले. विश्वासात घेत शोरूममधून दागिने विकले गेले. मात्र काही काळानंतर परतावा थांबला, आणि ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कोट्यवधींची गुंतवणूक लाटून, ‘टोरेस’कडून गुंतवणूकदारांची फसवणूक; गुन्हा दाखल
या गंभीर आर्थिक फसवणुकीप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(2), 316(5), 318(4), 3(5) आणि एमपीआडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची धुरा ठाणे शहरातील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे यांनी केलेल्या जाहीर आवाहनानुसार, “जे गुंतवणूकदार अद्याप तक्रार दाखल केलेली नाही त्यांनी आपल्या गुंतवणुकीसंबंधी सर्व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी तात्काळ संपर्क साधावा.”
शहरातील नामांकित शोरूमवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना फसवणुकीचा मोठा धक्का बसला आहे. हा प्रकार म्हणजे झगमगाटाच्या आड दडलेला काळा आर्थिक चेहरा आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



