
Navi Mumbai thackeray Group Joined Eknath Shinde Group : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रतोद रतन मांडवे यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
ठाणे :- नवी मुंबईतील ठाकरेंच्या 10 नगरसेवकांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले आहे. यामुळे नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तसेच काँग्रेस प्रणित कामगार संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईतील तब्बल 55 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने नवी मुंबईत शिंदे सेनेची ताकद वाढल्याचे पाहायला मिळत आहे.



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे आणि त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी ठाण्याच्या आनंदा आश्रमामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच बेलापूर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, शाखाप्रमुख अनुभव बेळे, शाखा संघटक जयश्री बेळे, विधानसभा संघटक सुनील सानप, विशाल गुंजाळ, अमित जाधव यांनी पक्षात प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रीय काँग्रेस प्रणित कामगार संघटना असलेल्या इंटकच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित बटनाकर पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रभाते कांबळे तसेच पुणे नाशिक अहिल्यानगर नंदुरबार धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि मुंबईतील विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, या सर्वांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमचा निकाली काढल्याने आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आमच्यावर उठसुठ टीका करणाऱ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेकडे आकृष्ट होत असून त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकांवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही


