क्राईम न्यूज

Navghar Police News : ‘कौटुंबिक संघर्षा’ची क्रूर परिणिती! भाईंदरच्या सराफाचे रहस्यमय हत्याकांड, दोन तासांत उलगडा

Navghar Police Latest News : ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? पत्नी आणि दोन मुलांनीच धारदार शस्त्रांनी केले वार; नवघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

भाईंदर :- भाईंदर पूर्व येथील एस.व्ही. रोडवर सराफ व्यावसायिक सुशांतो अबोनी पॉल (वय 51) यांच्या निर्घृण हत्येमुळे परिसरात निर्माण झालेला थरार अवघ्या दोन तासांत संपुष्टात आला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून जी माहिती समोर आणली आहे, ती अत्यंत धक्कादायक आणि कुटुंबातील नात्यांना काळिमा फासणारी आहे. पती-पत्नी आणि मुलांमधील पैशांवरून झालेल्या टोकाच्या कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे उघड झाले आहे. Bhayandar Latest Crime News

खून, तक्रार आणि तपासाचा थरार

19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सोनल पार्क येथील पॉल यांच्या शॉपमध्ये त्यांचा मृतदेह गंभीर जखमी अवस्थेत आढळला. डोक्यावर व कपाळावर धारदार आणि टणक हत्याराने वार करून त्यांना ठार मारल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लगेच तपासाची चक्रे फिरवली. मृत सुशांतो पॉल हे शॉपमध्ये एकटे राहत होते आणि त्यांची पत्नी व मुले त्यांच्याकडे पैशांसाठी सतत भांडण करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांनी दिली. याच माहितीच्या आधारावर, पोलिसांनी तपासाची दिशा ठरवत मयताची पत्नी अमृता सुशांतो पाल आणि दोन मुलांना ताब्यात घेतले.

क्रूर कबुली

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, अमृता पाल आणि मुलगा सुमित पाल यांनी खून केल्याची क्रूर कबुली दिली. पैशांवरून झालेल्या वादातून 18 नोव्हेंबरच्या रात्री हे हत्याकांड घडल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी आरोपी महिला अमृता पाल आणि मुलगा सुमित पाल यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.तसेच, हत्येत सहभागी असलेल्या एका विधीसंघर्षीत बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख पुढील तपास करत आहेत. केवळ दोन तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकून नवघर पोलिसांनी कौटुंबिक वादातून झालेल्या या गुन्ह्याचा प्रभावीपणे छडा लावला आहे.

vivek

Recent Posts