Navghar Police News : ‘घरफोडीचा थरार’ 24 तासांत उघड; नवघर पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Bhayandar Navghar Police Latest News : सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे; दीड लाखांच्या चोरीचा छडा लावत पोलिसांची धडाडीची कामगिरी
भाईंदर :- भाईंदर पूर्व येथील एका घरातून दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना नवघर पोलिसांनी Navghar Police News अवघ्या 24 तासांच्या आत गजाआड केले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर पोलिसांनी ही धडाडीची कामगिरी केली आहे. Bhayandar Police Latest News
29 जुलैच्या दुपारी 4.30 ते 30 जुलैच्या पहाटे दरम्यान ही घटना घडली. अश्विनी हॉस्पिटलजवळील ताजमहल अपार्टमेंटमध्ये राहणारे दुर्गेश तिवारी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील ड्रॉवरमधून 1.50 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून आरोपी पसार झाले होते. तिवारी यांच्या तक्रारीनंतर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
रात्रीच्या वेळी झालेल्या या गंभीर घरफोडीचा तपास तात्काळ सुरू झाला. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक मुकुंद यादव यांनी तपास पथक तयार केले. पथकाने सर्वप्रथम घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन संशयित आरोपी दिसून आले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपी विनोद उर्फ शुभम सुनील तायडे (वय 35, रा. पालघर) आणि त्याचा साथीदार मोहम्मद आफताब सर्फराज खान (वय 35, रा. पालघर) यांची ओळख पटवली.
पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि आरोपींना पालघरमधील हरणवाली येथून ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली की, अटक केलेला मुख्य आरोपी विनोद तायडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात 21 गुन्हे दाखल आहेत, तर मोहम्मद खानवरही 4 गुन्हे नोंद आहेत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली. या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, तसेच कर्मचारी जयप्रकाश जाधव, संतोष पाटील, भूषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, सुरजसिंग घुनायत, ओंकार यादव, संकेत मगर, नवनाथ पवार, उमेश अस्वार आणि कुणाल हिवाळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.



