National Herald Case Update : गांधी कुटुंबाला मोठा दिलासा! – नॅशनल हेराल्ड प्रकरणात राउज अव्हेन्यू न्यायालयाने ‘ईडी’च्या आरोपपत्राची दखल घेण्यास दिला नकार

राहुल आणि सोनिया गांधींना सध्या न्यायालयात हजर राहावे लागणार नाही; ‘सीबीआयने प्रेडिकेट गुन्हा नोंदवला नाही तरी ईडी तपास कसा करते?’ न्यायालयाने उपस्थित केला प्रश्न
ANI :- काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राउज अव्हेन्यू न्यायालयाने या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची (Charge Sheet) दखल घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे.
कोर्टाची महत्त्वपूर्ण निरीक्षणे
आज या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी आदेश वाचण्यास सुरुवात करताना, तपासाच्या मूळ केंद्रावरच प्रश्न उपस्थित केले.
न्यायमूर्ती म्हणाले, “सीबीआयने आतापर्यंत कोणताही प्रेडिकेट गुन्हा (Predication Offence) नोंदवलेला नाही. तरी देखील ईडीने पीएमएलए (PMLA) अंतर्गत तपास सुरू ठेवला आहे.”
यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत याच प्रकरणात नवीन गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता राउज अव्हेन्यू न्यायालयाच्या या निर्णयामुळे गांधी कुटुंबाला तात्काळ दिलासा मिळाला आहे.
ईडीचा मूळ आरोप काय?
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या तक्रारीत आरोप केला होता की, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असलेल्या असोशिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ची मालमत्ता बेकायदेशीरपणे यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड (YIPL) या कंपनीमार्फत बळकावण्यात आली आहे.
न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिल्यामुळे, सध्या या प्रकरणाची सुनावणी होणार नाही आणि राहुल गांधी व सोनिया गांधी यांना न्यायालयात हजर राहावे लागणार नाही, असे मानले जात आहे.


