Nashik Renuka Devi Temple : ‘जगदंबे’चा जागर! आदिशक्तीचे रूप असलेली रेणुका देवी नऊ रूपांत प्रकट; जाणून घ्या मंदिरांचा अनोखा इतिहास

- 51 शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या रेणुका देवीला यमाई, एकविरा, येल्लम्मा अशा विविध नावांनी ओळखले जाते
नवरात्र स्पेशल 2025,नाशिक :- देशभरात सध्या नवरात्रौत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच काळात आदिशक्तीचे एक प्रमुख रूप असलेली रेणुका देवी आपल्या विविध नावांनी आणि मंदिरांनी भक्तांना आकर्षित करत आहे. रेणुका देवीला 51 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ मानले जाते. ‘एकवीरा’, ‘यमाई’, ‘येल्लम्मा’ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या देवीची जगदंबा म्हणून पूजा केली जाते. ही देवी फक्त क्षत्रिय आणि ब्राह्मणांचीच नव्हे, तर आदिवासी आणि कोळी-आगरी समाजाचीही संरक्षक मानली जाते.
रेणुका देवीचा गौरवशाली इतिहास
रेणुका ही इक्ष्वाकु वंशातील महाराजा रेणु यांची कन्या असून, ती जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामांची माता आहे. परशुराम हे सप्तचिरंजीवांपैकी एक असून, अजूनही ते महेंद्र पर्वतावर गुप्त तप करत असल्याची श्रद्धा आहे. रेणुका मातेचे मुख्य मंदिर माहूरगडावर आहे, जिथे देवीचा मुखवटा सुमारे 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. या मंदिरामागेच भगवान परशुरामांचे मंदिर आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे
दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी रेणुका मातेने विविध अवतार घेतले आहेत. महाराष्ट्रात माहूरगडाव्यतिरिक्त अनेक ठिकाणी तिची मंदिरे आहेत. त्यापैकी काही प्रमुख मंदिरे:
श्री यल्लम्मा देवी, सौंदत्ती
श्री यमाई देवी, औंध (मूळपीठ)
श्री एकविरा देवी, कार्ले (विशेषतः कोळी-आगरी लोकांची कुलस्वामिनी)
श्री अंबामाता देवी, अमरावती
श्री मोहटा देवी, मोहटा
श्री पद्माक्षी रेणुका, कावाडे (अलिबाग)
पौराणिक कथा
एका दंतकथेनुसार, परशुरामांनी आपल्या आईचा शिरच्छेद केल्यानंतर, जमदग्नी ऋषींनी तिला पुनर्जीवित केले. त्यावेळी चुकीने एका दलित महिलेचे शिर रेणुका मातेच्या शरीरावर जोडले गेले आणि रेणुकेचे मस्तक दलित महिलेच्या शरीरावर ठेवले गेले. दलित महिलेचे शीर असलेल्या रेणुकेला जमदग्नींनी पत्नी म्हणून स्वीकारले. तर रेणुका मातेचे मस्तक असलेल्या दलित महिलेला ‘यल्लम्मा’ या नावाने पुजले जाऊ लागले. यल्लम्मा देवीला महाकालीचेच एक रूप मानले जाते.
या नऊ दिवसांच्या काळात रेणुका देवीच्या विविध रूपांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भक्त या मंदिरांना भेट देत आहेत.



