नाशिक

Nashik News : नाशिक महापालिका स्थायी समितीची बिनविरोध निवड! मनसे-अपक्षांना मित्रपक्षांची साथ; आता सभापती पदासाठी भाजपमध्ये चुरस

•भाजपचे 9, शिंदे गटाचे 4 तर ठाकरे गटाचे 2 सदस्य; सभापती पदासाठी मच्छिंद्र सानप, दीपाली कुलकर्णी यांची नावे आघाडीवर

नाशिक | नाशिक महानगरपालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या महासभेत स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी 16 नवनिर्वाचित सदस्यांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये प्रबळ पक्ष असलेल्या भाजपचे संख्याबळ 9 वर पोहोचले असून, आगामी सभापती निवडीत भाजपचाच वरचष्मा असणार हे स्पष्ट झाले आहे.

राजकीय धक्का आणि युतीची गणिते

या निवडीमध्ये काही धक्कादायक आणि रंजक बाबी समोर आल्या आहेत.

मनसेला शिंदे गटाची साथ : मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत गटनोंदणी केल्याने, त्यांना शिंदे गटाच्या कोट्यातून स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले आहे.

राष्ट्रवादीकडून अपक्षाला संधी : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या कार्यकर्त्यांऐवजी अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना संधी देऊन राजकीय धक्का दिला आहे.

पक्षनिहाय बलाबल: समितीत भाजपचे सर्वाधिक 9 सदस्य आहेत, तर शिंदे गट 4, ठाकरे गट 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 अशा जागांचे वाटप झाले आहे.

स्थायी समिती सदस्यांची नावे

भाजप (9) माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप

शिंदे गट (4) मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे

ठाकरे गट (2) योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे

राष्ट्रवादी (1) मुकेश शहाणे (अपक्ष)

सभापती पदासाठी भाजपमध्ये ‘फाइट’

सदस्यांची निवड बिनविरोध झाली असली, तरी आता खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू होणार आहे तो सभापती पदासाठी. भाजपमध्ये या पदासाठी तीन प्रबळ दावेदार मानले जात आहेत:

1.मच्छिंद्र सानप: उपमहापौर पदाची संधी थोडक्यात हुकल्याने सानप यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.

2.दीपाली कुलकर्णी: महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या कुलकर्णी यांचे नावही चर्चेत आहे.

3.माधुरी बोलकर: अनुभवी चेहरा म्हणून त्यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0