Nashik News : नाशिकमध्ये मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेतच राडा; दोन नेत्यांमध्ये जोरदार वाद

• Nashik Shiv Sena UBT MNS Meeting विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या मुद्द्यावरून वाद चिघळला; विनायक पांडे संतापून बैठकीतून बाहेर
नाशिक :- राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा जोर धरत असताना, आज नाशिकमध्ये याच दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या रणनीतीवर झालेल्या वादावादीमुळे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांनी बैठकीतून संतापून काढता पाय घेतला. या घटनेमुळे शहराच्या राजकारणात सध्या या ‘राड्याची’ जोरदार चर्चा सुरू आहे.
नाशिकमधील शिवसेना कार्यालयात मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील खड्डे, गुन्हेगारी, पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान, ठाकरे गटाचे नेते जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी नाशिकमधील गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर आपले मत मांडताना, ‘प्रचारादरम्यान एमडी ड्रग्ज सारखे मुद्दे चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने वसंत गीते यांचा पराभव झाला,’ असे म्हटले.
जयंत दिंडे यांच्या या विधानामुळे वसंत गीते यांचे निकटवर्तीय विनायक पांडे संतापले. त्यांनी लगेच उभे राहून, “जर आम्ही 40 वर्षांपासून लढा देत होतो, तर आम्ही नेमके काय केले?” असा सवाल उपस्थित केला. कारण, त्या निवडणुकीतील प्रचाराची धुरा वसंत गीते आणि विनायक पांडे यांनी एकत्रित सांभाळली होती.
वाद वाढल्यानंतर जयंत दिंडे यांनी तात्काळ माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र विनायक पांडे यांचा संताप कमी झाला नाही. ते बैठकीतून बाहेर पडले, तर जयंत दिंडे बैठकीतच थांबले. एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना, स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये झालेल्या या वादामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.



